कोल्हापूर : खिद्रापूर सरपंच-उपसरपंच निवडीला ६ महिने उलटूनही समित्यांसाठी मुहूर्त मिळेना | पुढारी

कोल्हापूर : खिद्रापूर सरपंच-उपसरपंच निवडीला ६ महिने उलटूनही समित्यांसाठी मुहूर्त मिळेना

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सहा महिने उलटली तरी एकाही कमिटीची स्थापना करण्यात आलेली नाही. उपसरपंच निवडणुकीत झालेल्या घोडेबाजाराने आणि कुरघोडी राजकारणामुळे सरपंच गटाला धक्का बसल्याने समित्यांवर आपले वर्चस्व राहणार नाही म्हणून निवडणूका घेतल्या जात नाहीत का? वर्चस्ववादासाठी गावचा विकास खुंटवणार का? असा सवाल ग्रामस्थातून उपस्थित होत आहे.

दरम्यान गावच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी गावची तंटामुक्त समिती अध्यक्ष कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. गावचे अनेक तंटे मिटवायला ग्रामस्थांना पोलीस पाटलांची वेळ घ्यावी लागते. वेळ मिळाली नाही तर थेट पोलीस स्टेशन गाठावे लागत असल्याची खंत ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. जानेवारी 2023 च्या गाव सभेत लोकनियुक्त सरपंच सदस्यांनीच मासिक सभेत समित्या निवडी कराव्यात असा ठराव एकमताने मंजूर करून दिला आहे. उपसरपंचाची निवड होऊन पाच महिने उलटले मात्र तंटामुक्त, पाणीपुरवठा, लाइटिंग व महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदाच्या अद्यापही निवड करण्यात आलेल्या नाहीत.

ग्रामपंचायतीत त्रिशंकुशस्थिती निर्माण झाल्याने उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच गटाला धक्का देत इतर सदस्यांनी मोट बांधत पूजा पाटील-खानोरे यांना उपसरपंच पदावर विराजमान केले. त्यानंतर सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे सरपंचांना समित्या स्थापन करण्यासाठी राजकीय डावपेच खेळावे लागणार आहेत. मात्र महिला सरपंचांच्या कडून कुरघोडीचे राजकारण होणे शक्य नाही.

ग्रामपंचायतीत विविध विकास कामाच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण आणखीन किती दिवस तेवत राहणार? विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वच सदस्यांनी एकत्रित येऊन गावच्या विकासासाठी सरपंचांनी सर्वच सदस्यांना तर वेगळी मोट बांधलेल्या सदस्यांनी सरपंचांना विश्वासात घेऊन विषय समिती निवडीचा प्रश्न मार्गी लावून विकासात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करावी ही अपेक्षा खिद्रापूरवासीयांनी व्यक्त होत आहे.

खिद्रापूर हे जागतिक पर्यटन स्थळ असणारे गाव आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी जाहीर झाला आहे. मात्र सभागृहातील लोकप्रतिनिधी वर्चस्व वादासाठी एकमेकावर आगपाखड करत आहेत.मतभेद बाजूला ठेवून विषय समितीच्या निवडी करून गावचा विकास साधने गरजेचे आहे.
– ग्रामस्थ रामगोंडा पाटील.

Back to top button