कोल्हापूर : निवृत्ती चौक तलवार हल्ला प्रकरणी 6 जणांना अटक | पुढारी

कोल्हापूर : निवृत्ती चौक तलवार हल्ला प्रकरणी 6 जणांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात बुधवारी प्रकाश बोडके याच्यावर तलवार हल्ला करणार्‍या सहा संशयित आरोपींना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. यामध्ये युवराज राजू शेळके (वय 21), कृष्णात कोंडीबा बोडेकर (27), केदार भागोजी घुर्के (27), करण राजू शेळके (19), राहुल सर्जेराव हेगडे (24), राजू सोनबा बोडके (32, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) यांचा समावेश आहे.

हल्ल्यानंतर हे संशयित पसार झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस त्यांना शोधत होते. पीरवाडी (ता. करवीर) येथील बिरोबा मंदिर माळ येथून शनिवारी त्यांना अटक करण्यात आली. विकास ऊर्फ चिक्या यासह आणखी 3 जण अद्याप सापडलेले नाहीत.

वाढदिवसाचा फलक फाडल्याच्या कारणावरून गेल्या वर्षभरापासून फुलेवाडी-बोंद्रेनगर आणि लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणांच्यात वाद सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी प्रकाश बोडके यांने संतोष बोडके याच्यावर तलवार हल्ला केला होता. याचा राग संतोष बोडके गटाच्या तरुणांमध्ये होता. संतोष बोडके याला 9 मेपासून पोलिसांनी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे; पण त्याच्याच गटातील लोकांनी बुधवारी दुपारी प्रकाश बोडकेवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. शनिवारी या मोहिमेला यश आले. हल्ल्यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. हल्ला केल्यानंतर ते गगनबावडा आणि परिसरात लपले होते; परंतु, पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला होता. ते जेथे पोहोचतील तेथे पोलिस जात होते. शनिवारी कळे येथे ते जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना गाठले आणि ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

एकमेकाच्या भीतीने हल्ला

प्रकाश बोडके याने गतवर्षी संतोष बोडके याच्यावर हल्ला केला होता. गेले वर्षभर दोन्ही गटांत वाद धुमसत होता. प्रकाश बोडकेच्या गटातील लोक आम्हाला मारतील, अशी भीती होती. त्यामुळे आपलीही त्यांच्यावर दहशत बसावी, या हेतूने हा हल्ला केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

Back to top button