कोल्हापूर : 'येळाणे'तील शाळी नदीला जलपर्णीचा विळखा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

कोल्हापूर : 'येळाणे'तील शाळी नदीला जलपर्णीचा विळखा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

विशाळगड : सुभाष पाटील : येळाणे येथील शिरगाव स्टँड नजीकची शाळी नदी गटारगंगा बनली असून पाण्यावर प्लास्टिक बाटल्या, कचरा, पालापाचोळा, जलपर्णीचा विळखा आदीने पाणी दूषित झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. शिरगाव, कोपार्डे, मलकापूर, येळाणे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेतीही धोक्यात आली आहे. नदीला मोकळा श्वास घेण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

एकेकाळी संथ, स्वच्छ, निर्मल वाहणारी, अनेकांच्या जीवाला गारवा देणारी शाळी नदी काही वर्षांत नदीची गटारगंगा झाली आहे. कचरा, कोंडाळा, मैलायुक्त सांडपाणी, जलपर्णी अशा अवस्थेत नदी वाहत आहे. नदीच्या दुतर्फा असणारी झाडी नदीचे अस्तित्वच नाहीसे करत असून नदी गायब होण्याच्या मार्गावर आहे. नदीपात्रात टाकाऊ वस्तू, कचरा, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, पालापाचोळा आदींचा खच साचल्याने नदी कचरा कोंडाळ्याच्या विळख्यात सापडली आहे.

नदीत पाण्याऐवजी मातीचा थर अधिक आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून पालिकेच्या वतीने स्वच्छतेचा बिगुल फक्त नावालाच वाजवला जात असल्याच्या तीव्र भावना व संताप नागरिकांतून केला जात आहे. पालेश्वर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाहही कमी झाला. येळाणे बंधाऱ्यावर पाटबंधारे विभागाने बरगे टाकून पाणी अडविले आहे. नदीमध्ये मलकापूर शहर तसेच उचत येथील गटारांचे पाणी मिसळते. पाण्याला उग्र वास येत असून, संपूर्ण नदीचे पाणी काळे झाले आहे.  नदीतून दहा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतीला या पाण्याशिवाय पर्याय नसल्याने काळ्या पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे.

प्रदूषण मंडळाने या नदीचे पाणी तपासून यावर उपाययोजना करावी व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाण्यापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांतून होत आहे. नदीपात्राच्या या बकाल अवस्थेने या भागाच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही दूषित बनले आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button