बिद्रीच्या निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष | पुढारी

बिद्रीच्या निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुदाळतिट्टा; प्रा. शाम पाटील : बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार के.पी. पाटील आणि दिनकरराव जाधव या दोन माजी आमदारांचे मनोमिलन होणार का? या निवडणुकीच्या निमित्ताने ते एकत्र येणार का? याविषयी बिद्री कार्यक्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दिनकरराव जाधव हे के. पी. पाटील यांच्या विरोधात लढले होते. त्यामुळे या निवडणुकीत जाधव काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी माजी चेअरमन म्हणून दिनकरराव जाधव व के.पी. पाटील या दोघांनाही ओळखले जाते. दोघांनीही आपल्या कार्यातून विधानसभा मतदारसंघात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याचबरोबर बिद्रीत देखील चांगले काम करून ऊस उत्पादक सभासदाला व संस्थेला न्याय मिळवून दिला आहे. अंदाजे 60 हजार सभासदांच्या मालकीचा हा बिद्री साखर कारखाना चालवणे म्हणावे तेवढे सोपे नाही. पण या दोन माजी आमदारांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासदांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

सध्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने बिनविरोधचे वारे वाहू लागले आहे. पण बिद्रीची निवडणूक बिनविरोध होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर बिद्री कारखान्याच्या इतिहासात एक नवा इतिहासच निर्माण होईल यात शंका नाही. या निवडणुकीत या दोन माजी आमदारांचे मनोमिलन होणार व ते एकत्रित राहणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

दिनकरराव जाधव हे काँग्रेस पक्षाला मानणारे नेतृत्व आहे. त्यामुळे बिद्री निवडणूक प्रसंगी होणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना व अन्य घटक पक्षांच्या युतीमध्ये ते सहभागी होतील व एकत्रितरीत्या कारखाना निवडणुकीला सामोरे जातील, असे सद्यस्थितीला स्पष्ट जाणवत आहे. यासंदर्भात चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. तसं पहायला गेलं तर राधानगरी विधानसभा मतदार संघावर प्रथम कडगाव कट्टा येथून लक्ष ठेवण्यात आले. पुन्हा गारगोटी येथून व त्यानंतर मुदाळ तिट्टा येथून लक्ष ठेवण्यात आले. सध्या गारगोटी येथून या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

जाधव व पाटील हे दोघे गुरु शिष्य आहेत. के. पी. पाटील दिनकरराव जाधव यांना आपले गुरु मानतात. त्याचबरोबर विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व के.पी. पाटील हे ही गुरु शिष्य आहेत. प्रकाश आबिटकर हे के. पी .पाटील यांच्या तालमीत तयार झाले आहेत. पण दोघाही शिष्यांनी गुरुला छडीटांग लावण्याचे काम या मतदारसंघात केले असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत. त्यामुळे बिद्रीच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जाधव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण कोणासोबत राहणार व बिद्रीचे हीत पहाणार हे येणारा काळच ठरवेल असे चित्र निर्माण झाले आहे.

भुदरगड तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी भुदरगड तालुक्यात दिनकरराव जाधव इथेनॉन प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात उभा राहणारा हा तिसरा प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. औद्योगिक प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून मागे असणारा तालुका सध्या औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर येताना दिसत आहे. त्यामुळे युवकांमध्ये समाधान दिसत आहे.

आमदार सतेज पाटील अंतिम निर्णय घेतील

बिद्रीच्या निवडणुकीमध्ये कोणासोबत जायचे यासंदर्भात निर्णय आमदार सतेज पाटील घेतील. त्या संदर्भात लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जाधव गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक होईल. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यानुसार ज्या गटाकडे आपल्या कार्यकर्त्यांना झुकते माप मिळेल त्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण बिद्री साखर कारखान्याची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. या कारखान्याचा आणि आमच्या घराण्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे चांगले काय आणि वाईट काय हे पाहून अंतिम निर्णय घेऊ.
– सत्यजित जाधव (दिनकरराव जाधव गटाचे नेते)

हेही वाचा : 

Back to top button