कोल्हापूर; प्रवीण मस्के : आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिला बचत गटांची प्रदर्शने भरवून त्या माध्यमातून भरड धान्यांचे पदार्थ बनवून नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. भरड धान्यांचे गावोगावी बचत गटांमार्फत मार्केटिंग केले जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरड धान्यांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार प्रदर्शने, शेतकरी आणि व्यापार्यांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. भरड धान्यास श्री अन्नदेखील म्हटले जाते. पूर्वीच्या काळी उखळ व मुसळाचा वापर करून धान्यावरील साल, साळ किंवा कवच भरडून जात्यावर दळून पीठ केले जात असे. यामुळे या धान्याला भरड धान्य असे म्हटले जाते.
भरड धान्याचे विविध प्रकार असून सुमारे 16 प्रमुख प्रकारची भरड धान्ये भारतात पिकवली व निर्यात केली जातात. ज्वारी व बाजरी, कोडो बाजरी आकाराने मोठी धान्ये असून त्यांना 'ग्रेटर मिलेट' म्हणतात. आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळ, कोदो, बर्टी, प्रोसो व ब—ाऊनटौप ही सर्व 'मायनर मिलेट' समजली जातात. राजगिरा, बकव्हीट (कुट्टू) यांना 'स्यूडो मिलेटस्' म्हणतात. भरड धान्ये ही पौष्टिक तृणधान्य म्हणूनदेखील ओळखली जातात. ही पचायला हलकी असतात. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून मातीचा पोत सुधारतो. ही धान्ये पाळीव प्राणी व पशू-पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. यामुळे जैवविविधता वाढण्यास मदत होते.
भरड धान्य पौष्टिक, फायटोकेमिकल्स युक्त, ग्लुटेन मुक्त, आम्ल (अॅसिड) निर्माण न करणारी आणि अॅलर्जीविरहित असतात. भरड धान्याचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा ट्रायग्लिसराइडस् व सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीनच्या प्रमाणात घट होते. ज्यामुळे हृदयविकार व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टळू शकतात. ही धान्य तंतुमय (फायबर युक्त) असतात. यामुळे पचनाचा कालावधी वाढून आतड्याची दाहकता कमी होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. ही धान्ये पचनसंस्थेतील उपयुक्त जीवाणूंसाठी प्रोबायोटिक खाद्य म्हणून कार्य करतात. मधुमेही लोकांसाठी भरड धान्य खाणे आरोग्यास लाभदायक ठरते. ही धान्ये नियासीन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासदेखील मदत करतात. याशिवाय त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट, इतर क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक असतात म्हणून भरड धान्ये पचायला हलकी असतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले आहे. भरड धान्य जनजागृतीसाठी महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. बचत गट प्रदर्शनाच्या माध्यमातून भरडधान्यांचे पदार्थ बनविणे, त्यांचे मार्केटिंगचे नियोजन केले जाणार आहे.
– डॉ. आर. व्ही. गुरव,
विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ