कोल्हापूर : फराळे येथे गोठ्याला आग लागून सहा म्हशींचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : फराळे येथे गोठ्याला आग लागून सहा म्हशींचा मृत्यू

सरवडे; पुढारी वृत्तसेवा : फराळे (ता. राधानगरी) येथील बाबूराव बाळू पाटील यांच्या गोठ्याला बुधवारी रात्री उशिरा शाँर्टसर्किटने आग लागून सहा म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. आगीत बाबुराव पाटील हेही जखमी झाले आहेत. आगीने सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, ही घटना बुधवारी रात्री घडली. बाबुराव पाटील यांचा घरालगतच जनावरांचा मोठा व सुसज्ज गोठा आहे. ते रात्री दहाच्या सुमारास जनावरांना वैरण घालून झोपण्यासाठी घरी गेले होते. त्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान पाटील यांच्या गोठ्याला आग लागल्याचे शेजारील काही महिलांच्या निदर्शनास आले. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बाबुराव पाटील गोठ्याजवळ पोहचले. ताबडतोब पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु गोठ्यातील माळ्यावर गवत, पिंजर वैरण असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या मध्ये गोठाघर अक्षरशः जळून खाक झाले. यामध्ये सहा दुभत्या मुऱ्हा म्हशींचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. तर एका म्हशीला वाचवण्यात यश आले. यामध्ये बाबुराव पाटील हे जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात भाजल्याने जखमी झाले आहेत. आगीमध्ये पाटील यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी गोकुळ संचालक अरुण डोंगळे, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी भेट देऊन गोकुळ संघ सहकार्य व मदत करेल असे आश्वासन यावेळी दिले. तर जयवंत डवर, संदीप डवर, विलास डवर, लक्ष्मण गिरी, सुरेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित राहून मदतकार्यास हातभार लावला. पाटील यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी मदत करण्याचे आव्हान केले आहे. सद्या दुग्धव्यवसाय जिकिरीचा बनला असताना जनावरांचा होरपळून झालेल्या मृत्यूने संपूर्ण पाटील कुटूंबियांचे आर्थिक कंबरडे मोडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button