पोस्टाच्या योजनांची बँकांना टक्कर; व्याजदर बँकांपेक्षा अधिक | पुढारी

पोस्टाच्या योजनांची बँकांना टक्कर; व्याजदर बँकांपेक्षा अधिक

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जर तुम्ही बँकांमध्ये एक, दोन अथवा पाच वर्षांसाठी आपल्या पैशांची एफडी स्वरूपात गुंतवणूक करत असाल, तर विचार करणे गरजेचे आहे. बँकांपेक्षा पोस्टाच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकतो. पोस्टाचा व्याजदर बँकांपेक्षा अधिक असून, टाईम डिपॉझिट योजना बँकांच्या मुदत ठेव योजनांना टक्कर देऊ लागल्या आहेत.

नोकरदार वर्ग, महिला तसेच सेवानिवृत्तांकडून राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, सोसायट्या तसेच पोस्टात पैशांची गुंतवणूक केली जाते. राष्ट्रीयीकृत बँकांकडून बचतीवर मिळणारे व्याजदर वेगवेगळे आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात पोस्टात बचत करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नवीन आर्थिक वर्षात पोस्टातील ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकांबरोबर पोस्टातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे. त्यामुळे बँकांबरोबरच पोस्टात बचत खाते, मासिक उत्पन्न खाते तसेच तीन व पाच वर्षांसाठी पैशांची एफडी करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाच्या माध्यमातून बचत योजना चालवली जाते. या माध्यमातून ज्येष्ठांना सर्वाधिक 8.2 टक्के इतके व्याजदर दिले जाते. खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी ज्येष्ठ बचत खाते परिपक्व होते. व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी जमा होत असते. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांबरोबरच पोस्टातील ठेवींची संख्या देखील वाढली आहे.

विविध योजनांना चांगला व्याज दर…

पोस्टात विविध योजनांना चांगला व्याज दर मिळत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक बचत खाते 8.2 टक्के, राष्ट्रीय बचत खाते 7.7 टक्के, 1 वर्षे मुदत ठेव 6.8 टक्के, 2 वर्षे मुदत ठेव 6.9 टक्के, 3 वर्षे मुदत ठेव 7.0 टक्के, 5 वर्षे मुदत ठेव 7.5 टक्के, आरडी 5 वर्षे 7.2 टक्के, सुकन्या समृद्धी योजना 8.0 टक्के, किसान विकास पत्र 7.5 टक्के, मासिक उत्पन्न योजना 4.5 टक्के, बचत खाते 4.0 टक्के, भविष्य निर्वाह निधी 7.1 टक्के एवढे व्याज मिळत आहे.

पोस्टातील गुंतवणूक अधिक सुरक्षित व लाभदायी मानली जाते. शिवाय पोस्टाकडून ठेवींवर दिला जाणारा व्याजदरही अधिक आहे. त्यामुळे पोस्टात गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे.
– संदीप घोडके, सहायक अधीक्षक, मुख्य डाकघर

Back to top button