कोल्हापुरात साकारणार फुटबॉल स्ट्रीट

कोल्हापुरात साकारणार फुटबॉल स्ट्रीट

कोल्हापूर, सतीश सरीकर : सॉकर सिटी म्हणून कोल्हापूरचा देशभर नावलौकिक आहे. त्यामुळेच खेळाडूसह त्यांच्या समर्थकांना प्रोत्साहित करून फुटबॉलची ऊर्जा अखंडितपणे तेवत ठेवण्यासाठी कोल्हापुरात फुटबॉल स्ट्रीट साकारण्यात येणार आहे. महापालिकेने दोन कोटी 74 लाखांचा हा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला आहे. छत्रपती शाहू स्टेडियम आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम यांच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर फुटबॉल स्ट्रीट होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीतून पहिल्या टप्प्यात 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून स्टीलच्या कमानी, पेव्हिंग ब्लॉक, बैठक व्यवस्था, फुटबॉलपटूंचे कटआऊट, लँडस्केपिंग आदी कामे केली जाणार आहेत. आठ-दहा दिवसांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उर्वरित कामे दुसर्‍या टप्प्यातील निधी मिळाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

कोल्हापूरकरांतील फुटबॉल प्रेमाचे वेड जगप्रसिद्ध होत आहे. फुटबॉल म्हणजे तरुणांचे स्पिरिट आहे. फुटबॉल हंगामाच्या कालावधीत बहुतांश तरुणांची पावले आपोआप शाहू स्टेडियमकडे वळतात. स्थानिक खेळाडूंच्या सामन्याला 25 ते 30 हजार प्रेक्षक उपस्थित असतात. फुटबॉल वर्ल्डकप कालावधीत तर पेठांपेठातील ईर्ष्या टोकाला जाते. चौकाचौकात आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे भव्य पोस्टर लागलेले असतात.

कोल्हापूरच्या फुटबॉलला शंभर वर्षांपासून परंपरा आहे. आता तर कोल्हापुरातील प्रत्येक पेठेची आणि प्रत्येक तालमीची फुटबॉल टीम आहे. प्रचंड ईर्ष्येने फुटबॉल खेळला जातो. कोल्हापुरात शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी येतात. कोल्हापुरात फुटबॉलची लोकप्रियता पाहून परदेशी विद्यार्थ्यांनाही येथे खेळण्याचा मोह आवरता येत नाही. म्हणूनच कोल्हापुरातील विविध तालमींच्या संघात केनिया, नायजेरिया, इराक, इराणचे खेळाडू खेळताना दिसतात. ठरावीक संघ वगळता बहुतांश संघात परदेशी खेळाडू खेळत आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूरकर त्यांच्यावरही आपल्या स्थानिक खेळाडूएवढा जीव लावून समर्थक बनले आहेत. राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाल्याने कोल्हापूरचा फुटबॉल बहरत आहे.

महापालिकेचा 2.74 कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट

2.74 कोटींतून होणारी कामे

  • दिलबहार तालीम ते शाहू स्टेडियम प्रवेशद्वार सिमेंट-काँक्रिटचा रस्ता
  • अ‍ॅम्पी थिएटर
  • या रस्त्यावर जागोजागी स्टीलच्या चार कमानी
  • ठिकठिकाणी आकर्षक बैठक व्यवस्था
  • पाथ वे
  • लँडस्केपिंग
  • फुटबॉल थीमवर कटआऊट
  • सुशोभित कुंड्या
  • प्रत्येक फुटबॉल टीमचा झेंडा

फुटबॉल हंगामात छत्रपती शाहू स्टेडियम परिसर खेळाडूंच्या समर्थकांनी ओसंडून वाहत असतो. या ठिकाणी फुटबॉल स्ट्रीट असावे, अशी असंख्य फुटबॉलप्रेमींची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच विकासकामे सुरू केली जातील.

– हर्षजित घाटगे, शहर अभियंता

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news