

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये होणार्या उन्हाळी सत्र परीक्षा 25 मे पासून सुरू होणार आहेत. याबाबतचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुढील नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठ परीक्षा विभागाने यापूर्वी पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार वेळापत्रक तयार केले, परंतु नवीन शैक्षणिक सत्र प्रारंभ व निकालाच्या द़ृष्टीने विद्यापीठाने परीक्षा अलीकडे घेतल्या आहेत. 25 मे पासून विद्यापीठाकडून बीए., बी.कॉम., बी.एस्सी., भाग-3, बीबीए, बीसीए, बीए बीएड (स्पेशल), बीएसडब्ल्यू, बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझाईन अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होईल. या परीक्षा जुलै महिन्यापर्यंत चालणार आहेत. मार्च-एप्रिलमधील उन्हाळी सत्राच्या पदवी स्तरावरील पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाकडून जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने जाहीर केलेल्या सुधारित परीक्षा वेळापत्रकानुसारच नियोजन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
स्वयंम परीक्षा, कंपनी सेक्रेटरी परीक्षा तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार्या आभियांत्रिकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माणशास्त्र व इतर अभ्यासक्रमांच्या 'एमएचटी-सीईटी' परीक्षा व सार्वजनिक सुटट्टीदिवशी विद्यापीठाकडून लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार नसल्याचे विद्यापीठाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.