कोल्हापूर : दिवसातून चार वेळा घुमणार शाहू मिलचा भोंगा

कोल्हापूर : दिवसातून चार वेळा घुमणार शाहू मिलचा भोंगा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  एकेकाळी कोल्हापूरकरांसाठी गजरचे काम करणार्‍या शाहू मिलच्या भोंग्याचा आवाज आता दिवसातून चार वेळा कानावर पडणार आहे. पहाटे 6, सकाळी 11, दुपारी 3 व सायंकाळी 6 अशा वेळा निश्चित करण्यात आल्या असून रोज हा भोंगा शाहू मिलच्या वैभवाची आठवण करून देणार आहे.

शाहू मिल सुरू असताना येथे कामाच्या शिफ्ट बदलताना हा भोंगा वाजत होता. जुन्या काळातील अनेकांच्या दिवसातील कामांचे नियोजन या भोंग्याच्या आवाजावर असायचे अशा आठवणी अनेकांनी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त जागवल्या. शनिवारी सकाळी 11 वाजता शाहू मिल येथे हा भोंगा वाजविण्यात आला. तसेच इथून पुढे दररोज दिवसातून चार वेळा हा भोंगा वाजणार आहे.

मावळा ग्रुपकडून पाठपुरावा

मावळा कोल्हापूर संस्थेने हा भोंगा बसविण्यासाठी तसेच तो नियमित वापरात राहावा, यासाठी वर्षभर पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. शनिवारी या भोंग्याचे उद्घाटन येथील माजी कर्मचारी महादेव पाटील यांच्या हस्ते झाला. यासाठी सहकार्य करणारे शाहू मिलचे जनरल मॅनेजर मोहन पारगुंडे, भोंगा बसविण्याचे काम पूर्ण करणारे रणजित साळोंगे, लाईटचे काम करणारे किरण घुमे यांचे मावळा संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी मावळाचे उमेश पोवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाबा इंदुलकर, शिवसेनेचे संजय पवार, युवराज पाटील, संतोष हेब्बाळे, जयकुमार शिंदे, उदय देसाई, महेश चित्रुक, राहुल भोई, किसन कल्याणकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news