Encroachment on Panhala : पन्हाळ्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून २४ तासांची मुदत | पुढारी

Encroachment on Panhala : पन्हाळ्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून २४ तासांची मुदत

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा शहरातील फूटपाथवर विक्रेते व खाद्य व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. नुकतेच दोन वर्षाच्या बालकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने सोमवारी (दि.२४) अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत तबक उद्यान परिसरातील अतिक्रमणे हटवली. तसेच मुख्याधिकारी यांनी उर्वरीत अतिक्रमणे हटविण्यासाठी व्यावसायिकांसाठी २४ तासांसाठी अल्टीमेटम दिला आहे. (Encroachment on Panhala)

पन्हाळा शहरात पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना फिरण्यासाठी सर्व रस्त्यांच्याकडेला फूटपाथची सोय आहे. पण, या फूटपाथवर खाद्य पदार्थ विकणारे, खेळणी विकणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. तसेच अनेक ठिकाणी फूटपाथवर वाहने पार्क केली जातात. अनेक ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. तसेच काहींनी फुटपाथवर शेड मारून व्यवसाय सुरू केले आहेत, त्यामुळे पन्हाळ्यात पर्यटकांना रस्त्यावरून ये-जा करावी लागते. नुकतेच एक दोन वर्षाच्या बालकाचा फिरत रस्त्यावर आल्याने वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. (Encroachment on Panhala)

एका बालकाचा हकनाक जीव गेल्यानंतर पन्हाळा पालिकेला जाग आली असून प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी मंगळवारी सकाळी तबक उद्यान प्रवेशद्वार परिसरातील मुख्य रस्त्यावरील टपऱ्यांच्या अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. तबक उद्यान समोरच्या रस्त्यावर फुटपाथ पूर्ण व्यवसायिकांनी वेढले आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासन स्थानिक व्यवसायिक आहेत म्हणून त्याकडे पाहत नव्हते. मात्र तबक उद्यान ते सज्जा कोठी रस्त्यावर फुटपाथ पूर्ण अतिक्रमण झाल्याने येथे गर्दीतून वाट काढत जाणे देखील अत्यंत धोकादायक होत आहे. अशी बऱ्याच पर्यटकांनी तक्रार केली होती, त्यातच खेळणी, सायकली व अनेक छोटी मोठी वाहने व रस्त्यावरच खाद्यपदार्थ खात उभारणारे लोक यामुळे हा रस्ता धोकादायक ठरू लागला होता.

मंगळवारी पन्हाळा नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यास सुरवात केल्यानंतर व्यवसायिकांनी आपले अतिक्रमण काढून घेतो असे सांगितले. त्यामुळे सर्वाना येत्या २४ तासात सर्व फुटपाथ कायमस्वरूपी पर्यटक नागरिकांना फिरण्यासाठी रिकामे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फुटपाथवर कोणी व्यवसायाचे बोर्ड ठेवले तरी ते पालिका प्रशासनाकडून जप्त केले जाईल अशी माहिती कार्यालय अधीक्षक अमित माने यानी दिली आहे. प्रशासक चेतनकुमार माळी यांनी सर्व पन्हाळ्यातील फुटपाथ सर्वांसाठी मोकळे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फुटपाथवर कोणी व्यवसाय सुरु केला तरी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अधिक वाचा :

Back to top button