कोल्हापूर : रेठरे येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : रेठरे येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शित्तूर वारूण (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात दिवसभर उष्मा वाढला होता. अशातच दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे रेठरे (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी बाबुराव बापू जाधव (वय ६१) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेठरे येथील बाबुराव जाधव या गरीब शेतकऱ्याच्या दुर्देवी मुत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रेठरे येथील शेतकरी बाबुराव जाधव यांनी जनावरासाठी घराच्या पाठीमागे गवताची होळी रचून ठेवली होती. शुक्रवार (दि. ०७) अचानक वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली होती. म्हणून घरातील प्लॅस्टिक कागद घेऊन जाधव हे होळीवर झाकण्यासाठी गेले. कागद होळीवर झाकत असताना अचानक काही क्षणात त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले.

ही घटना ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी बापूराव जाधव यांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेची कल्पना शाहुवाडी पोलीस ठाणे व महसूल विभागाला देण्यात आली. पोलिसांनी रात्री घटनेचा पंचनामा करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बाबुराव जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

अधिक वाचा :

Back to top button