खिद्रापूर : कोपेश्वर मंदिर व परिसराच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ४६ लाखाचा निधी मंजूर

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा खिद्रापूर ता. शिरोळ येथील पुरातन कोपेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत ३ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला आहे.
दरम्यान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुबलक निधी देण्यात येणार आहे. या योजनेत खिद्रापूर कोपेश्वर मंदिराला माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने शिरोळ तालुक्याचे ऐश्वर्य असणाऱ्या कोपेश्वर मंदिराचे सुशोभीकरण होणार असल्याने देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दैनिक पुढारीने खिद्रापूरचे शिल्प वैभव संकटात या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुरातत्त्व खाते आणि जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलवून या संदर्भाचा अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यात आला. राज्य सरकारच्या बदलामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता.
याबाबत माजी मंत्री डॉ.पाटील-यड्रावकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व राज्य मंत्रिमंडळाने तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याचे माजी मंत्री डॉ.पाटील- यड्रावकर यांनी सांगितले.
३ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीतून ८८ लाख वाहनतळ, ८९ लाख नदी घाट व परिसर सुधारण्यासाठी, ८६ लाख कोपेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता करण्यासाठी, ७३ लाख कोपेश्वर मंदिर स्वागत कमान व रस्ता करण्यासाठी तर १० लाख रुपयांची स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. या कामाला लवकरच निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होऊन सुरुवात होणार आहे.
हेही वाचा :