Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार, नाशिक येथे अजित पवारांची टीका | पुढारी

Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार, नाशिक येथे अजित पवारांची टीका

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

महागाई बरोबरच बेरोजगारी वाढली आहे, त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारकडे वेळ नाही. दहावी, बारावीचा पेपर फुटला, सरकार घोषणा देते गतिमान सरकार… गारपीट झाली नुकसान भरपाई मिळत नाही, सरकार घोषणा देते गतिमान सरकार… जर शेतकरी, तरुण, सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नसेल तर हे तर कसले गतिमान सरकार, हे तर दळभद्री सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा येथे १३२ केव्ही सबस्टेशन व जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, आमदार आशुतोष काळे, आमदार दिलीप बनकर, निवृत्ती मामा डावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, अॅड. रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, ज्येष्ठ नेते अॅड. भगिरथ शिंदे, रंजन ठाकरे, राजाराम मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे, राकाँचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय गडाख, मंगला कुन्हाडे, मनीषा माळी, बाळासाहेब गाडगे, केरू खताळे आदी उपस्थित होते.

देशभरातील विविध राज्यांमध्ये असलेली विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजप आपली शक्ती पणाला लावत आहे. मात्र, सामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा पध्दतीचे खालच्या पातळीचे राजकारण भाजप सरकारकडून सुरू असल्याबद्दल ना. पवार यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. कांद्याला भाव नाही, पीकविम्याचा परतावा नाही, कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहे. असे असताना राज्यातील शिंदे-फडणवीस गतिमान सरकार कसे असू शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजप सरकारने उद्योगपतींचे सुमारे ११ लाख १० हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत तसा कळवळा दाखवता आला नाही. त्यामुळे हे सर्वसामान्यांचे नव्हे तर मुठभर लोकांचे सरकार असलेल्याचे टीकास्त्रही ना. पवार यांनी सोडले.

हेही वाचा : 

Back to top button