

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,०९५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या १५,२०८ वर पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.६१ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १,३९० रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गुरुवारी देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली होती. गुरुवारी कोरोनाचे ३,०१६ नवे रुग्ण आढळून आले होते. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा 'अलर्ट मोड'वर आहे. देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढतेय. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ तसेच कर्नाटकमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी ६९४ रुग्ण आढळून आले होते. यात मुंबईतील १९२ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. याआधी बुधवारी ४८३ रुग्ण आढळून आले होते. तर २७ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्रात ९७२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी रुग्णसंख्येचा आकडा वाढला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजारांवर गेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला आहे. तर मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट गुरुवारी १२ टक्के होता. मुंबईत १९२ नवीन आढळून आल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८४६ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रासह केरळ, दिल्लीतील रुग्णसंख्येतील वाढ झाली आहे. केरळमध्ये बुधवारी ६८६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्याआधीच्या दिवशी ३३२ रुग्णांची नोंद झाली होती. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रंटलाइन कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सर्व पॉझिटिव्ह नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत, असे निर्देशही सरकारने दिले आहेत.
हे ही वाचा :