Kolhapur : वडाच्या निर्जीव लाकडातून साकारली सजीव कलाकृती; ‘इश्काची इंगळी’ची रसिकांना भूरळ! | पुढारी

Kolhapur : वडाच्या निर्जीव लाकडातून साकारली सजीव कलाकृती; 'इश्काची इंगळी'ची रसिकांना भूरळ!

सरुड : पुढारी वृत्तसेवा, दगडात देवपण साकारणाऱ्या मूर्तिकारांप्रमाणे निर्जीव लाकडात जीव ओतणारे काष्ठ शिल्पकार हे अलौकिक प्रतिभावंत कलेचे भोक्ते असतात. त्यांना सतत असंशोधित क्षेत्र खुणावत राहतात, तसा त्यांचा कलेचा प्रवास पुढे पुढे सरकत राहतो. यापैकीच एक अशोक जाधव या काष्ठ शिल्पकाराने रस्त्याच्या कडेला मोडून पडलेल्या वडाच्या लाकडात इंगळी (विंचू) बरोबरच कमनीय बांध्याच्या स्त्रीचे हुबेहूब (काष्ठ) शिल्प साकारले आहे. या शिल्पाला त्यांनी ‘इश्काची इंगळी’ हे नाम विशेष संबोधन दिले आहे. (Kolhapur)

दीड वर्षात ‘इश्काची इंगळी’

इश्काची इंगळी साकारणारे कलाकार अशोक जाधव हे मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अशोक जाधव (मूळ गाव चिंचोली, ता. शिराळा) हे एके दिवशी कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरून प्रवास करताना करंजोशी येथे रस्त्याकडेला मोडून पडलेल्या वडाच्या फांदीवर त्यांची नजर स्थिरावली. जवळ जाऊन फांदी न्याहाळताना त्यामध्ये विंचवाचा आकार डोकावला. निसर्गाची ही अद्भूत कलाकृती नजरेआड न करता प्रवासात खंड पाडून आपलीशी केली. यात त्यांना करंजोशी येथील विद्यार्थी शिष्याची मदत मिळाली. हे काष्ठ (लाकूड) विद्यार्थ्याच्या घरी ठेवले. यानिमित्ताने कलासक्त जीवनात एखादा प्रसंग, क्षण अविस्मरणीय ठरतो, तसेच काहीसे झाले. विंचवाची प्रतिमा डोक्यात घोळत असल्याने त्यांनी कल्पनाशक्तीतून लाकडाच्या प्राकृतिक रचनेशी दृकसंवाद साधला. आणि अप्रतिम दर्जेदार काष्ठशिल्प आकाराला आले. या निर्मितीला जवळपास दीड वर्ष लागले.

दरम्यान विंचवाचे शिल्प साकारत असताना यामध्ये अजून काही तरी वेगळे करता येईल या ध्यासाने इंगळी आणि इश्काचा डंख यांचा सुंदर मिलाफ साधण्याची कल्पना जाधव यांना सुचली. एक वडाची छोटी फांदी.. त्यात स्त्रीचा कमनीय बांधा आणि दोन्ही बाजूच्या त्या दोन फांद्या या जणू इंगळीच्या बाकदार, टोकदार नांग्याच. त्याच फांद्या या वर हात केलेल्या स्त्रीचे घायाळ करणारे रूप भासवतात. या प्रतिकृतीत वक्षस्थळ, ओटीपोट आणि कंबर… आणि त्या खाली एक पाय जणू प्रेम लाथाडत असल्याचे हे आभासी काष्ठशिल्प म्हणजे निसर्गाच्या कुशीतून जन्मलेला अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल.

Kolhapur : शोधकता हा या कलेचा हेतू

थोडक्यात या निसर्गदत्त अनमोल कलाकृतीमध्ये एका बाजूला इंगळी (विंचू)चा नांगा तर दुसऱ्या बाजूला स्त्रीचा हात तयार केला आहे. त्या खालील लाकडाच्या जाडीत कमनीय सुडौल स्त्रीचा एकीकडे पाय, तर दुसऱ्या बाजूला इंगळीची शेपटी नांगा जो डंक मारण्यासाठी पुढे केलेला दिसतो. एकंदरीत स्त्रीच्या सुंदर सुडौल बांध्याची मोहकता, तिची चंचलता, दगाबाजी आणि इंगळीचा चपळपणा या शिल्पातून साकारण्याची किमया सुरेखतेने साधली गेली आहे.

अशा या कल्पनेच्या भावभावनांचे दर्शन घडविणारे हे शिल्प नग्न दिसत असले तरी त्यात अश्लीलता नाही. सत्याशी जखडलेली ही नग्नता आणि शोधकता हा या कलेचा हेतू दर्शवितो. हे जग मनानं, सौंदर्यानं अधिक नटावं, त्या ईश्वराच्या देण्याचा साक्षात्कार सामान्य माणसांना घडावा, त्यातून त्यांचं जीवन उन्नत व्हावं, हाच शुद्ध हेतू कलावंत म्हणून जवळ बाळगावाच लागतो, असे ‘इश्काची इंगळी’ काष्ठशिल्पकार अशोक जाधव हे आपल्या कलेबद्दल प्रांजळपणे सांगतात.

हेही वाचा 

Back to top button