

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतींसाठी आता जिल्हा परिषदेने नवीन अॅप विकसित केले आहे. ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात आलेल्या अॅपला 'एस. एम. जोशी ग्रामविकास अॅप' नाव देण्यात आले. त्याचे उद्घाटन मंगळवारी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले. अॅपमुळे प्रशासनाचा वेळ वाचणार आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची प्रगतीची सद्य:स्थिती समजणे शक्य होणार आहे. ग्रामविकासाशी निगडित 'एस. एम. जोशी ग्रामविकास अॅप'च्या उद्घाटनाला झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (पंचायत) व सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
राजेश कुमार यांनी हे अॅप शासनस्तरावरून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा विचार करता येणार असल्याचे म्हटले. आयुष प्रसाद म्हणाले, या अॅपवर शासनस्तरावरून प्राप्त सर्व शासन निर्णय तसेच शासनाकडील व जिल्हा परिषदेकडील व इतर संबंधित परिपत्रके एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे जिल्हास्तर, तालुकास्तर, मंडलस्तरावर पर्यवेक्षकीय कामकाजासाठी उपयुक्त राहील. माहिती संकलित करणे सुकर होणार आहे. या माहितीचे विश्लेषण करणे सोपे होणार आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रम कामांबाबत त्यांना या अॅपद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल.