जोतिबा मंदिरात शनिवारपासून होणार धार्मिक विधींना प्रारंभ | पुढारी

जोतिबा मंदिरात शनिवारपासून होणार धार्मिक विधींना प्रारंभ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दख्खनचा राजा जोतिबाचे पायी खेटे झाल्यानंतर भक्तांना वेध लागतात ते चैत्र यात्रेचे. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी येथे लगबग सुरू झाली आहे. प्रशासनाने दर्शन रांगा, पार्किंग सुविधा, सासनकाठी मार्ग, अन्नछत्राची व्यवस्था याची तयारी केली आहे. शनिवारी (दि. 1) कामदा एकादशीपासून धार्मिक विधी, पालखी प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे. मानाच्या सासनकाठ्याही दोन दिवसांनी कोल्हापुरात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.

गुढी पाडव्यानंतर जोतिबा डोंगरावर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. जोतिबा देवस्थानच्या वतीने गुढी पाडव्यापासून कार्यक्रम सुरू होतात. शनिवार (दि. 1 एप्रिल) कामदा एकादशीपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हा पालखी सोहळा चैत्री यात्रेनंतरही 16 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दररोज रात्री साडे आठ वाजता ही पालखी मंदिराभोवती निघते.

चैत्र पौर्णिमेचा मुख्य सोहळा

चैत्र यात्रेच्या आदल्या दिवशी जोतिबाची सालंकृत बैठी पूजा बांधली जाते. यादिवशीही भाविकांची मोठी गर्दी दर्शनाला होत असते. बुधवार 5 एप्रिल या यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता शासकीय अभिषेक तहसीलदारांच्या हस्ते व देवस्थान समिती सचिव, व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी 12 वाजता परंपरेनुसार पालकमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. पूजनानंतर सासनकाठ्या यमाई मंदिराकडे रवाना होतात. दर्शनानंतर आपापल्या ठिकाणी रवाना होतात. तर काही मुक्कामी असतात. रविवार 9 एप्रिलला मधला रविवार, 16 एप्रिलला पाकाळणी रविवारी पालखी सोहळा पार पडेल. 17 एप्रिललाही पाकाळणी आहे. पाकाळणीनिमित्त जोतिबाची खडी पूजा बांधली जाते.

आर. के. मेहता ट्रस्टतर्फे 3 दिवस अन्नछत्र

आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 4 ते 6 एप्रिल कालावधीत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जोतिबा डोंगरावरील जिल्हा परिषद जुन्या गेस्ट हाऊसजवळ सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत अन्नछत्र सुरू असणार आहे. 6 एप्रिल रोजी पहाटे 5 ते रात्री 10 या वेळेत अन्नछत्र सुरू राहील.

झंवर ग्रुपतर्फे मोफत बससेवा

झंवर ग्रुपच्या वतीने चैत्र जोतिबा यात्रेकरूंसाठी पंचगंगा पूल ते जोतिबा डोंगर मोफत बससेवा दिली जाणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत भाविक याचा लाभ घेऊ शकतील. बसमधील भाविकांना पाणी, चिक्की, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटपही केले जाणार आहे.

Back to top button