पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली प्रबळ आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय: ज्योतिरादित्य सिंधिया | पुढारी

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली प्रबळ आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय: ज्योतिरादित्य सिंधिया

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आर्थिक शक्तीमध्ये आज भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. भारत २०१३-१४ साली ११ व्या स्थानावर होता. भारत प्रबळ आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. गेल्या नऊ वर्षात हे पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली शक्य झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पोलाद व नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रवास योजना व आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना कार्ड वितरण कार्यक्रमांसाठी मंत्री जोतिरादित्य सिंधिया पन्हाळा येथे आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

सिंधिया म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात शेतकरी हा अन्नदाता मानला होता.  महाराजांनी सदैव शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. आपल्या सैन्याला आज्ञापत्रे देऊन शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला देखील नुकसान होऊ नये, याची दक्षता छत्रपती शिवाजी महाराज घेत असत. आजच्या वर्तमान काळात हाच विचार, हीच प्रेरणा घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करत आहेत. शेतकरी विकास, महिला सशक्तीकरण हा या सरकारचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच  पंतप्रधान किसान सन्मान योजना भारताच्या तळागाळात अत्यंत सफलतेने यशस्वी झाली आहे. शेतकरी सर्वांचा अन्नदाता आहे. त्यांच्या विकासासाठी ६ हजार कोटींचा निधी दरवर्षी दिला जात आहे. आतापर्यंत ११ कोटी  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हर घर नल योजना, उज्ज्वल योजना, आयुष्यमान योजना या सारख्या विकास योजनांमधून लोकांचा विकास होत आहे. २० कोटी नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येकी ५ लाखांची आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. सबका साथ सबका विकास हा मोदी यांचा नारा आहे, यासाठी केंद्रात व राज्यात भाजपला मतदान करावे, असे आवाहनही सिंधिया यांनी यावेळी केले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजाराम शिपुगडे, के. एस. चौगले, मारुती परितेकर, अविनाश चरणकर, पन्हाळा माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल, पन्हाळा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष  माधवी भोसले, अमर भोसले, अजय चौगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पन्हाळा येथील दलित वस्तीमध्ये जमिनीवर पंगतीत बसून  सिंधिया यांनी जेवण घेतले.

       हेही वाचलंत का ? 

Back to top button