आदमापूर : बाळूमामा मंदिर २० महिन्यांनंतर दर्शनासाठी खुले | पुढारी

आदमापूर : बाळूमामा मंदिर २० महिन्यांनंतर दर्शनासाठी खुले

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा मंदिर तब्बल २० महिन्यांनंतर घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर खुले झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.

मार्च 2020 मध्ये होणारी बाळूमामांची वार्षिक भंडारा यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. कोरोनामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच मोठी यात्रा होती. त्या वेळेपासून आजपर्यंत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच होते. शासनाच्या आदेशानुसार आज ७ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेदिवशी राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये बाळूमामा मंदिराचाही समावेश आहे. आज पहिल्याच दिवशी अनेक भाविकांनी बाळूमामांच्या दर्शनाचा लाभ घेतला. दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत होते. देवस्थान समिती प्रशासनाने दर्शनाची चांगली सोय केली आहे. पश्चिमेच्या बाजूकडून दर्शन मंडपातून रांगेतून दर्शन व पूर्वेकडच्या बाजूने मुखदर्शन अशा दोन्ही दोन्ही प्रकारे होणाऱ्या दर्शनाची सोय केली आहे. यामुळे भाविकांना सुलभ दर्शन उपलब्ध झाले आहे.

सकाळी चार वाजल्यापासून अभिषेक, समाधी पूजन, नित्य पुजा अर्चा करण्यात आली. पाच वाजता आरती झाली.बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या पहिल्या भाविकाचे बाळूमामा देवस्थानचे पुजारी मुरारी मुसाई, व इतरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिवसभर असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. व्यापारी वर्गाने आपली छोटी मोठी व्यवसायाची दुकाने आज सुरू केली असून चांगला व्यवसाय होत असल्याने त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करुन भक्तांसाठी सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवून दर्शन होत आहे. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फटाक्यांची आतिषबाजी…

घटस्थापनेदिवशी बाळूमामा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दसरा सणानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घटस्थानेपासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button