कोल्हापूर: पुनाळ येथील वीर जोत्याजी केसरकर स्मारकास 'क' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

कळे: पुढारी वृत्तसेवा : पुनाळ (ता.पन्हाळा) येथील ऐतिहासिक वीर जोत्याजी केसरकर स्मारकास अखेर ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. याबाबत स्थानिक व प्रशासकीय पातळीवर गेले दोन वर्षे चाललेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू शिलेदार असलेल्या वीर जोत्याजी केसरकर यांच्या ऐतिहासिक स्मारकास ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी आजतागायत अनेकांनी प्रयत्न केले. पण यामध्ये यश येत नव्हते. गेल्यावर्षी महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती दीपक ठाकरे यांनी स्मारकास भेट देऊन पर्यटनस्थळ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
या स्मारकास ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी ज्योती ठाकरे, आमदार विनय कोरे यांच्या सहकार्याने व सरपंच युवराज पाटील, उपसरपंच पुष्पा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून यश आले आहे. यासंदर्भातील पत्र ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायतीने नुकतेच स्वीकारले. यामुळे पुनाळ ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे.
वीर ज्योत्याजी केसरकर स्मारकास ‘क’ वर्ग पर्यटन स्थळासाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग पर्यटनवाढीबरोबर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केला जाईल. भविष्यात स्मारकास ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– युवराज पाटील, सरपंच, पुनाळ
हेही वाचा
- कोल्हापूर: आम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळणार की नाही ? वंचित शेतकऱ्यांचा सवाल
- कोल्हापूर : कल्याणकारी महामंडळाने रिक्षाचालकांचे ‘कल्याण’ होणार?
- कोल्हापूर: शाहूवाडीतील ‘हे’ आहे ‘जंगल रेशीमचे गाव’; ऐनच्या ३८ वृक्षावर ५ हजार ७०० कोषांची निर्मिती