कोल्हापूर : कल्याणकारी महामंडळाने रिक्षाचालकांचे ‘कल्याण’ होणार? | पुढारी

कोल्हापूर : कल्याणकारी महामंडळाने रिक्षाचालकांचे ‘कल्याण’ होणार?

कोल्हापूर, डॅनियल काळे : रिक्षाचालक हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. वर्षानुवर्षे हा घटक शासकीय योजनांपासून दुर्लक्षित राहिला आहे. राज्यभरात सहा लाखांहून अधिक तर कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 25 हजार रिक्षा व्यावसायिक आहेत. रिक्षाचालकांची कौटुंबिक, आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. त्यातून विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे.

राहायला घर नाही, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद नाही, स्वत:सह कुटुंबांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर रुग्णालयात जाण्यासाठीही पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. महाराष्ट्र शासनाने गुरुवारी (दि. 9) महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. हे महामंडळ रिक्षाचालकांची होत असलेली कोंडी फोडेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रिक्षाचालकांच्या आरोग्याचे प्रश्नही गंभीर

रिक्षाचालक दिवसातून दहा ते बारा तास रिक्षा चालवितात. कोल्हापूरसह सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात रस्त्याची अवस्था बिकट आहे. खड्ड्यांमुळे रिक्षा व्यावसायिक मणक्याच्या आजारांनी त्रस्त आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. त्याचबरोबर ताणतणाव- धावपळ, आर्थिक दबाव यामुळे रक्तदाब, मधुमेह आदी विकारांनीही रिक्षाचालक त्रस्त आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविणार्‍या योजनांचा समावेश या कल्याणकारी बोर्डाने करायला हवा.

Back to top button