कोल्हापूर: शाहूवाडीतील ‘हे’ आहे ‘जंगल रेशीमचे गाव’; ऐनच्या ३८ वृक्षावर ५ हजार ७०० कोषांची निर्मिती | पुढारी

कोल्हापूर: शाहूवाडीतील 'हे' आहे 'जंगल रेशीमचे गाव'; ऐनच्या ३८ वृक्षावर ५ हजार ७०० कोषांची निर्मिती

विशाळगड : सुभाष पाटील : महाराष्ट्रातील काही गावांना ‘पुस्तकांचे गाव’, ‘मधाचे गाव’ अशी ओळख आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी-धनगरवाडी गावाला  ”जंगल रेशीमचे गाव” अशी नवी ओळख प्राप्त होणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांनी झाडावर टसर अळी सोडली असून त्यातून कोष तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळून त्यांना त्यांचे दाम मिळण्यास मदत होणार आहे. येथील टसर रेशीम प्रकल्पासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेतला आहे. ऐन वृक्षाच्या एकूण ३८ झाडांवर टसर अळीची अंडीपुंज उबवण करून त्यांचे ५ अवस्थांत संगोपन, संरक्षण व देखभाल करण्यात आली. ऐन वृक्षांवर सुमारे ५ हजार ७०० कोषांची निर्मिती या प्रयोगादरम्यान झाली आहे.

रेशीम म्हटले की, महिलांच्या साड्यांसह इतर वस्त्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये रेशीम वस्त्राला मोठी मागणीही आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जंगलाचा मोठा भाग लाभलेला आहे. दुर्दैवाने या जंगल परिसरातील वाड्या-वस्ती, गावांसह परिसर मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. कामासाठी ग्रामस्थांना जिल्ह्याच्या ठिकाणासह पुण्या-मुंबईची वाट धरावी लागते. वनपरिक्षेत्र मलकापूर वन्यजीव येथील ऐनवाडी गावात टसर रेशीम अळी संगोपन व कोषनिर्मिती प्रयोग सुरू करण्यात आला आहे. १० डिसेंबर २०२२ रोजी ऐन नावाच्या वृक्षावर टसर रेशीम कोषाला सुरुवात केल्यानंतर दोन महिन्यांतच टसर अळीने कोष तयार करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ऐनवाडी हे गाव ‘जंगल रेशीम गाव’ म्हणून उदयास येत आहे. रेशीमचे जाळे विणून येथील शेतकरी वर्गाला आता मोठा स्वयंरोजगार गावातच उपलब्ध होणार आहे. यातून या गावाचं अर्थकारणच बदलून जाणार आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटनाचाही ओघ वाढणार आहे.

असा केला प्रयोग-

ऐनवाडी येथे १० डिसेंबरपासून ऐन वृक्षाच्या एकूण ३८ झाडांवर टसर अळीची अंडीपुंज उबवण करून त्यांचे ५ अवस्थांत संगोपन, संरक्षण व देखभाल करण्यात आली. प्रत्येक दिवशी टसर अळ्यांची वाढ, ऐन वृक्षाची पाने, खाद्य, भौगोलिक हवामान, तेथील आर्द्रता, वातावरण यांच्या नोंदी ठेवल्या. अळ्यांच्या अवस्था पूर्ण होताना त्यातील अडचणी-समस्या व पोषक वाढ यांचे निरीक्षण करण्यात आले. १५ फेब्रुवारीपासून काही पूर्ण वाढ झालेल्या अळ्यांनी स्वतः भोवती रेशीम धागा विणत ऐन वृक्षांच्या फांद्यांवर उत्कृष्ट कोष निर्मितीपर्यंत अभ्यास केला. २८ फेब्रुवारीपर्यंत झाडावरील सर्व अळ्यांनी रेशीम कोष निर्मिती करून प्रयोग यशस्वी केला. निवड केलेल्या ऐन वृक्षांवर सुमारे ५ हजार ७०० कोषांची निर्मिती या प्रयोगादरम्यान झाली आहे. म्हणून ऐनवाडी गावाला ‘जंगल रेशीमचे गाव’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

यांनी घेतला पुढाकार..

येथील टसर रेशीम प्रकल्पासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर वनविभाग, व संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत ऐनवाडी, स्थानिक महिला बचत गट, शेतकरी यांच्या सहकार्याने या प्रयोगाची संकल्पना साकारली. यात सुभाष भोसले, ग्रामसेवक जालिंदर भोसले, बाळू व्हावळे, यशवंत व्हावळे, सुभाष व्हावळे, भिकाजी व्हावळे, पांडुरंग व्हावळे, राहुल व्हावळे यांनी सहभाग घेतला आहे. या प्रयोगासाठी मुख्य वनसंरक्षक आर. एम रामानुजम, उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, टसर रेशीम तज्ञ युवा शेतकरी आकाश मेश्राम, मोरेश्वर सोनकुसरे, नितेश दिघोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

टसर रेशीमची खास वैशिष्ट्ये…

* वनक्षेत्रातील गावांमध्ये टसर (वन्य) रेशीम शेती स्थानिकांकडून स्वीकार
* मुबलक प्रमाणात उपलब्ध ऐन झाडांवर टसर रेशीम कोष निर्मिती
* रेशीम कोष निर्मिती, धागा निर्मिती व कापड निर्मितीची उपलब्धता.
* मशागत, पाणी, औषधाची गरज नसलेली शेती
* जंगल भागातील शेतकरी, महिला व युवकांना नावीन्यपूर्ण व शाश्‍वत उद्योग.
* केवळ दोन महिने कालावधीतच रेशीम कोषांची निर्मिती होणार
* वन्यप्राण्यांपासून ऐन झाड व टसर अळीला कोणत्याही प्रकारची इजा नाही
* टसर रेशीम कोष, धागा व कापड उद्योगातून मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षमता मिळेल
* रोजगार हमी योजनेअंतर्गत ऐन झाडांची लागवड शक्य
* पश्‍चिम घाटातील जैवविविधता वाढण्यास मदत.

दऱ्याखोऱ्यात शाश्वत विकास…‘टसर (वन्य) रेशीम-शाश्वत रोजगार प्रकल्प’ अंतर्गत ऐनवाडीत हा प्रकल्प राबवला जात आहे. ऐन वृक्षाची पाने हे टसर अळीचे खाद्य आहे. टसर रेशीमला ‘वन्य रेशीम’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात टसर रेशीम उद्योग आदिवासी समुदायांसाठी रोजगाराचा प्रमुख स्रोत ठरला आहे. दऱ्याखोऱ्यांमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागानेच टसर रेशीम कोषनिर्मिती प्रयोग केला जात आहे.

वन्य भागांत स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी वनविभागाच्या सहाय्याने सामाजिक संस्था काम करत आहेत. निसर्गाची कोणतीही हानी न होता उलट निसर्गाला पूरक असे टसर रेशीमसह विविध प्रकल्प राबवले जाऊ शकतात. आमच्या गावात हा उपक्रम राबवताना सुरुवातीला अडचणी आल्या. आता मात्र स्थानिकांना हक्काचे काम मिळण्यास मदत होत असल्याने अत्यानंद होत आहे.

– स्थानिक ग्रामस्थ

टसर रेशीमसाठी ऐनवाडी गावाची निवड करण्यापूर्वी त्या परिसराचा अभ्यास करण्यात आला. टसर अळीचे खाद्य, तेथील पोषक वातावरण, ग्रामस्थांना पटवून देऊन त्यांची भूमिका विचारात घेऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली. टप्प्याटप्प्याने टसर रेशीमचे उत्पादन, त्यासाठी लागणारी बाजारपेठ याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच हा उद्योग वृद्ध, महिला, मुले अगदी दिव्यांग व्यक्तीही करू शकतात.

-डॉ. योगेश फोंडे, उपजीविका तज्ञ, टसर (वन्य) रेशीम प्रकल्प

हेही वाचा 

Back to top button