कोल्हापूर: आम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळणार की नाही ? वंचित शेतकऱ्यांचा सवाल | पुढारी

कोल्हापूर: आम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळणार की नाही ? वंचित शेतकऱ्यांचा सवाल

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासंदर्भात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे या वंचित शेतकऱ्यांतून आम्हालाही प्रोत्साहन अनुदान मिळणार की नाही ?, असा सवाल उपस्थित होत आहे.

या अनुषंगाने शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षात वितरित पीक कर्जापैकी ज्या शेतकऱ्यांनी तीन पैकी एक किंवा दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत कर्जफेड केली आहे. ते शेतकरी पात्र असतील. असे म्हटले आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या यादीत केवळ दोन वर्षे कर्ज उचल करून परतफेड केलेल्या शेतकऱ्यांचीच नावे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना हा लाभ प्राप्त झाला आहे. मात्र, या पहिल्या दोन यादीमध्ये तीन पैकी एका वर्षात परतफेड केलेल्या एकाही शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली नाहीत.

त्यामुळे हे शेतकरी कदाचित प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार असल्याचे जाणकरांतून बोलले जात आहे. वास्तविक शासनाने परिपत्रकात जाहीर केलेली नियमावली व प्रत्यक्षात करण्यात येत असलेल्या अंमलबजावणीत विरोधाभास दिसून येत आहे. तरी सहकारी संस्था व सेवा सोसायटीच्या मार्फत प्रोत्साहन अनुदानासाठी प्राप्त सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ द्यावा, अशी मागणी अद्यापपर्यंत नावे प्रसिद्ध न झालेल्या वंचित शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा 

Back to top button