कोल्हापूर: नृसिंहवाडीत कृष्णेची पाणीपातळी खालावली; प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न | पुढारी

कोल्हापूर: नृसिंहवाडीत कृष्णेची पाणीपातळी खालावली; प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीची पाण्याची पातळी प्रमाणापेक्षा खालावलेली आहे. पाण्याखालचे दगडी पिचिंग पूर्णपणे दिसत आहेत. त्याचबरोबर पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भाविकांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदीचे पाणी तातडीने प्रवाहित करणे आवश्यक आहे. राजापूर धरणातून बर्गे घालणे, अन्य मार्गातून बॅकवॉटरची व्यवस्था संबंधित अधिकारी वर्गाने तातडीने करावी, अशी मागणी भाविक तसेच नागरिकांतून होत आहे.

मार्च महिन्यातच कृष्णा नदीने तळ गाठला आहे. मे महिन्यात उन्हाळी सुट्टीमुळे येथे भाविकांची मोठी गर्दी असते. शिवाय एप्रिल, मे महिना हा लग्नमुंजीचा हंगाम असतो. त्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक येथून भाविक येथे धार्मिक कार्ये करण्यासाठी येत असतात. सध्या खोकला, ताप, डोकेदुखीची सगळीकडे साथ आहे. अशातच कृष्णा नदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. प्रदूषित पाण्यामुळे रोगांच्या साथीत भर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नदी काठावरील शेतकरी चिंतेत

सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी घटल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पिकांना पाणी देण्यासाठी नदी पात्रात टाकलेल्या विद्युत मोटारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button