उद्धव ठाकरे शिमग्यापासून दौऱ्यावर; ५ मार्च रोजी रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात पहिली सभा | पुढारी

उद्धव ठाकरे शिमग्यापासून दौऱ्यावर; ५ मार्च रोजी रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात पहिली सभा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षावरील ताबा आणि चिन्हाचा लढा गमाविल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राज्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. येत्या ५ मार्च रोजी खेड येथे त्यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली आहे.

रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यातील ही सभा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाने तयारीला सुरूवात केली आहे. मैदान अपुरे पडायला हवे एवढी गर्दी सभेला व्हायला हवी, असे आवाहन ठाकरे यांनी या भागातील कार्यकर्त्यांना केले आहे. बुधवारी मातोश्रीवर खेड-दापोलीतील शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा आपला दौरा जाहीर केला. यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गीते यांच्यासह मोठ्या संख्येने कोकणातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसैनिकांना आवाहन यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सभेच्या दुसऱ्या दिवशी शिमगा आहे, त्यांचा शिमगा रोजचाच आहे. त्यांना बोंबलायला लावू. तुमचा उत्साह दांडगा आहे. या सभेकडे पूर्ण देशाचे लक्ष असणार आहे, कारण पहिली सभा आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घ्या. सर्वसामान्य लोक मैदानात येणार आहेत. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर कांदा- भाकरी घेऊन शिवसैनिक आले होते, ही आपली ताकद आहे. राहिलेला कांदा त्यांच्या नाकाला लावूया, असा टोलाही त्यांनी लगावला.

Back to top button