कोल्हापूर : सांगरूळ, खुपिरे, कुडित्रे, वाकरेत मतदानासाठी रांगा

कोल्हापूर : सांगरूळ, खुपिरे, कुडित्रे, वाकरेत मतदानासाठी रांगा
Published on
Updated on

कोपार्डे, पुढारी वृत्तसेवा : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ईर्ष्येने मतदान झाले. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी या पाच तालुक्यांत मतदार असलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

105 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मंगळवारी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे काम पाहत आहेत.

सत्तारूढ नरके पॅनेलचे नेतृत्व माजी आमदार चंद्रदीप नरके करत असून, आमदार पी. एन. पाटील व विनय कोरे यांनी विरोधी राजर्षी शाहू कुंभी-कासारी बचाव पॅनेलला बळ दिले आहे. चार अपक्षांसह दोन्ही पॅनेलचे 46 असे एकूण 50 उमेदवार रिंगणात आहेत.

सत्ताधारी गटाचे प्रमुख असलेले माजी आ. चंद्रदीप नरके यांनी राजकीय अड्डा करून कारखाना अडचणीत आणला आहे, असा आरोप विरोधकांनी लावून धरला होता. शेवटच्या टप्प्यात चंद्रदीप नरके यांनी प्रचार यंत्रणा आक्रमकपणे राबवून ज्या नेत्यांनी विरोधी शाहू आघाडीला पाठिंबा दिला होता, त्या आ. पाटील व आ. कोरे यांच्या कारखान्याचा लेखाजोखा मांडत कुंभी कारखान्याचा कारभार पारदर्शकता, विश्वासार्हता व वचनबद्धता या त्रिसूत्रीवर सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याने प्रचारात चांगलीच रंगत आली होती.

रविवारी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी 11 पर्यंत जवळपास 50 टक्के मतदान पूर्ण झाले होते. स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे येथे संस्था गटातून पहिले मतदान माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. भैरवनाथ विकास सेवा संस्था, मुटकेश्वर या संस्थेच्या नावे त्यांनी मतदान केले. माजी आमदार, चेअरमन चंद्रदीप नरके, विरोधी राजर्षी शाहू कुंभी-कासारी पॅनेल प्रमुख बाळासाहेब खाडे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अजित नरके, चेतन नरके, माजी जि. प. सदस्य राहुल पाटील, संदीप नरके यांनी संस्था गटातून मतदान केले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सांगरूळ येथे, तर ज्येष्ठ नेते अरुण नरके यांनी बोरगाव (ता. पन्हाळा) येथे मतदानाचा हक्क बजावला.

'ब' वर्ग सभासदांचे मतदान ठरणार निर्णायक

ब वर्ग संस्था सभासद मतदार संख्या 368 असून यापैकी 319 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारांना पहिल्यांदाच पूर्ण 23 मतदानांचा हक्क मिळाल्याने निवडणूक निकालात या मतदारांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

कोगे, गणेशवाडीत किरकोळ वादावादी

करवीर पश्चिम भागात कुंभी साखर कारखान्यासाठी मोठ्या ईर्ष्येने मतदान झाले. दरम्यान, कोगे व गणेशवाडी येथे मतदान करण्यावरून किरकोळ वादावादी झाली. चारच्या सुमारास कोगे येथे मतदान करण्यावरून वादावादी झाली. पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन जमावाला पांगवत शांततेचे आवाहन केले.

दरम्यान, तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता; तर गणेशवाडी येथे बाराच्या दरम्यान संबंधित वयस्क महिलेचे मतदान करण्यावरून दोन गटांत वादावादी झाली. पश्चिम भागात ही दोन ठिकाणे वगळता सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.

भानामतीची चर्चा

सांगरूळ (ता. करवीर) येथे भानामती केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याची चर्चा दिवसभर कुंभी परिसरात होती. या भानामतीबाबत उलटसुलट आरोप केले जात आहेत.

एकाच बूथवर एकाच वेळी

सत्तारूढ नरके पॅनेलचे प्रमुख चंद्रदीप नरके व विरोधी राजर्षी शाहू कुंभी-कासारी बचाव पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब खाडे दोघेही एकाच वेळी एकाच बूथवर कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालयात संस्था सभासद मतदान करण्यासाठी आले. दोघांत काहीच बोलणे झाले नाही.

मतदान टक्केवारी घटली

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 85 टक्के मतदान झाले होते. यावेळी 82.45 टक्के मतदान झालेने 3.66 टक्केने मतदान घटल्याचे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news