कोल्हापूर: नृसिंहवाडी येथे दर्शन व्यवस्थेचे नियोजन करा : भाविकांतून मागणी | पुढारी

कोल्हापूर: नृसिंहवाडी येथे दर्शन व्यवस्थेचे नियोजन करा : भाविकांतून मागणी

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. गर्दीच्या वेळी मिठाई बाजारपेठ ते मुख्य दत्त मंदिर या मार्गावर दर्शनासाठी जाताना भाविकांना आणि नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या मार्गावर अनेकवेळा धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडले आहेत. याचा फटका महिला, लहान मुलांना बसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने नेटके नियोजन करून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी माघ महिन्याच्या पौर्णिमेदिवशी धक्काधक्की झाल्याचा प्रकार घडला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. शासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने गर्दीच्या वेळी या रस्त्याची पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता रुंद करणे, रहदारीला अडथळा येईल अशी अतिक्रमणे हटवणे, एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणे, दुकाने मागे घेणे, या पर्यायावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिक आणि दुकानदारांची मते अजमावून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा प्रांतातून प्रत्येक पौर्णिमा, दत्त जयंतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाढत्या गर्दीच्या वेळी पोलीस बंदोबस्त अपुरा असतो, अशी तक्रार भाविकांतून होत आहे. त्यामुळे दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हा प्रश्न संयुक्तपणे सोडवणे आवश्यक आहे.

हेही वाचा 

Back to top button