कोल्हापूर : बिअर शॉपीच्या बोगस परवान्याचा मुद्दा तापला! शिये ग्रामस्थांमधून कारवाईची मागणी | पुढारी

कोल्हापूर : बिअर शॉपीच्या बोगस परवान्याचा मुद्दा तापला! शिये ग्रामस्थांमधून कारवाईची मागणी

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : शिये ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनानंतरची ग्रामसभा सोमवारी (दि. ६) पार पडली. ग्रामसभा पुन्हा एकदा विविध विषयांनी वादळी ठरली, गावात दारूबंदी असताना एका बियर शॉपीला परवानगी देण्यात आली, हा बोगस दाखला देणारा गुन्हेगार की दाखला घेणारा गुन्हेगार? बोगस कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आलेल्या दाखल्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत निर्णय होईल पण दाखला देणारा आणि घेणारा यापैकी दोषींवर कायद्यान्वये कारवाई व्हायलाच हवी अन्यथा समाजात कायद्याचा धाकच उरणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थातून उमटली आहे.

शहरालगतच्या करवीर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतचा कारभार कायमच वादग्रस्त ठरला आहे. कधी गायरानात अतिक्रमण, कधी गायरानात अवैध उत्खनन, कधी वित्त आयोगातील पैशांचा भ्रष्टाचार तर कधी दारूबंदी असताना अवैधरित्या दिलेला दाखला या आणि अशा अनेक कारणांनी गावाचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभा ही पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने वादळी झाली होती. दरम्यानच्या काळात याची चौकशी सुरू होती, याचा चौकशी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर झाला. यानंतर २६ जानेवारीची ग्रामसभा ६ फेब्रुवारी रोजी झाली. या ग्रामसभेत पंधराव्या वित्त आयोगातील निधीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी दाखल करा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी गदारोळ झाला.

दरम्यान एका माजी सरपंचांने स्वतःच ग्रामसेवक आणि सरपंचाचे शिक्के मारून आपल्या कारकिर्दीत गावात दारूबंदी असताना बियर शॉपीला दाखला दिला, असे पाच दाखले दिल्याचे ग्रामसभेत पुढे आले आहे. या दाखल्यांची मात्र ग्रामपंचायत मध्ये कोणतीही अधिकृत नोंद नव्हती. गावात दारूबंदी असताना बोगस दाखल्यांच्या आधारेच गावात बिअर शॉपीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घेऊन दारू विक्री सुरू आहे.

ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ५० क्रशर कार्यरत आहेत, गायरानातील काही सर्वे नंबर मध्ये उत्खननास बंदी करावी याबाबतही ग्रामसभेत वादळी चर्चा झाली, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष बदलासाठी ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. एकूणच शिये ग्रामपंचायतची ग्रामसभा सोमवारी स. दहा वाजल्यापासून दु. तीन वाजेपर्यंत सुरू होती.

हेही वाचा

Back to top button