

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मृत्यूचे सापळे बनलेल्या खड्ड्यांच्या १०० फोटोंचे प्रदर्शन दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले होते. जनसंघर्ष सेनेकडून आयोजित या प्रदर्शनातून महापालिकेच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा निषेध करण्यात आला. शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, ताराबाई पार्क उपनगरातील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.
दरवर्षी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्चूनही रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या घरासमोर रस्त्यांची दुरावस्था असतानाही कोणतीही उपाययोजना केली जात नाही, हेच कोल्हापूरकरांचे दुर्दैव आहे. दसरा चौक येथे भरलेल्या या प्रदर्शनाला शहरवासीयांनी फोटो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी नागरिकांकडून खड्ड्याबाबत आपले अनुभव, तसेच मान-पाठ -कंबरदुखीला निमित्य तसेच कोरोनानंतर आता गाड्या मेकॅनिक क्षेत्राला भरभराटी आल्याची चर्चा सुरू होती.
प्रदर्शनाच्या माध्यमातून रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून पंधरा दिवसात प्रशासनाकडून रस्त्यांच्या कामाबाबत कार्यवाही न झाल्यास महापालिकेत आयुक्त कार्यालयात ५०० फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी दिली.
यावेळी जनसंघर्ष सेनेचे सुनील थोरवत, संदेश पोलादे, सतीश कदम, वैभव पाटील,संग्राम जाधव, प्रथमेश पोवार, यश पोवार, अक्षय कांबळे, मूबीन मुश्रीफ, प्रथमेश मुळीक, राजस जोशी, हर्षद पडवळ, अमित चव्हाण, मितेश संकपाळ, मयूर संकपाळ आदी उपस्थित होते.