Fake Currency : कर्जात बुडण्यापेक्षा… चल, नोटा छापूया! | पुढारी

Fake Currency : कर्जात बुडण्यापेक्षा... चल, नोटा छापूया!

कोल्हापूर, गौरव डोंगरे : ना कोणते छपाई तंत्र, ना कोणते यंत्र, ना कोणता कारखाना, तरीही खर्‍याखुर्‍या नोटांसारख्याच नोटा (Fake Currency) छापून सर्वसामान्यांच्या डोळ्यांत धूळफेक सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील कळे येथे सापडलेल्या साडेचार लाखांच्या बनावटनोटांचा माग काढताना अनेक गोष्टींचा खुलासा होतो आहे. काही महिन्यांपूर्वी कर्जाच्या ओझ्यात बुडालेल्या संदीप कांबळेला ओळखीतील अभिजित पवारने नोटा छपाईचा सल्ला दिला आणि केवळ फोटोग्राफीच्या ज्ञानाच्या जोरावर गेल्या सहा महिन्यांपासून त्याने नोटा छापण्याचा धडाका लावला.

नोटांची छपाई हा जवळपास देशविरोधी कृत्याचा भाग दिसून येतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत वापरले जाणारे चलन बोगस तयार करून ते बाजारात खपविणे म्हणजे तसा गंभीर गुन्हा; परंतु यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करत हा गोरखधंदा सध्या कोणीही करू लागला आहे. आधार केंद्रातील फोटोशॉपीची कामे करणार्‍या संशयिताने तर स्वत:च्या घरातच ही छपाई सुरू केली होती.

नोटांचा वापर नेमका कोठे, कोठे?

बनावट नोटा छपाईप्रकरणी संदीप कांबळे, अभिजित पवार, चंद्रशेखर पाटील व दिग्विजय पाटील अशा चौघांना अटक झाली. संदीप कांबळेने पवारच्या मदतीने नोटा छपाई केल्याचे पुढे आले आहे, तर चंद्रशेखर पाटील हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्याला नोटा दिल्याचे कांबळे व पवार यांनी सांगितले. चंद्रशेखर पाटीलने पोलिसांना दिलेल्या माहितीत कांबळेला दिलेले पैसे परत आणण्यास गेलो असता त्याने खर्‍या नोटांऐवजी बनावट नोटा दिल्याचे सांगितले, तर दिग्विजय पाटील हा चालक म्हणून गेल्याचे समोर आले आहे.

कर्जपुरवठा, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, बचत गटांची कर्जे यापैकी कोठे कोठे या बनावट नोटांचा वापर झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

संदीप बुडाला होता कर्जात

संदीप कांबळे याने कळे भागात एक निधी बँक सुरू केली होती. त्यानेअनेकांना कर्जे पुरवली. यात त्याने अभिजित पवारलाही कर्ज मिळवून दिले. दोघांची चांगली ओळख झाली. पुढे काही महिन्यांत कर्ज पुरवठा, वसुलीतील त्रुटी, कर्मचारी पगार, जागा भाडे भागवताना संदीप कांबळे मेटाकुटीला आला. लोकांचे पैसे परत करण्यासाठी त्याने स्वत:च कर्ज घेतल्याने कर्जबाजारी झाला. याचवेळी संशयित अभिजित पवारने त्याला नोटा छपाईचा सल्ला दिला.

खर्चापाण्यासाठी छपाई

संशयित अभिजित पवार (रा. गडमुडशिंगी) याच्यावर गांधीनगर पोलिसांत यापूर्वीही बनावट नोटा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने पोलिस तपासात या नोटा कर्नाटकातून आणल्याचे सांगितले होते. त्याने संदीप कांबळेलाही अशा नोटा छपाईसाठी त्याच्या फोटोशॉपी ज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला. मग यातूनच संदीपने नोटा छपाई केली. सुरुवातीला स्वत:च्या खर्चासाठी तो बाजारातील वस्तू आणताना या नोटांचा वापर करत होता, अशी माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button