महाराष्ट्र-कर्नाटक सीमा जोडणाऱ्या ‘त्या’ रस्त्यावर पहिल्यांदाच पडणार डांबर | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा जोडणाऱ्या 'त्या' रस्त्यावर पहिल्यांदाच पडणार डांबर

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या कोनेवाडी (ता. बेळगाव) ते देवरवाडी – शिनोळी या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर आता पहिल्यांदाच डांबर पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या निधीतून या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येत असून असून खडीकरण, डांबरीकरण होणार आहे. हा रस्ता महाराष्ट्राच्या हद्दीत आहे, मात्र कोनेवाडी (ता. बेळगाव) या गावातील ग्रामस्थांसाठीच या रस्त्याचा वापर गरजेचा आहे. त्यामुळे कोनेवाडी ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

सीमाभागातील अनेक रस्त्यांचा अद्याप विकास झालेला नाही. त्याशिवाय कोनेवाडी (ता. बेळगाव) येथील शेकडो कामगार हे शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीकडे नोकरीनिमित्त ये-जा करतात. कोनेवाडी या गावात भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सदर भाजी विक्रेते हे शिनोळी मार्गे चंदगडला याच मार्गाने पुढे जातात. तसेच कोनेवाडी येथील शेतकऱ्यांची ७० टक्के हुन् अधिक शेती चंदगड तालुक्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे हा रस्ता नवीन होणे गरजेचा होता. कोनेवाडी (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

रविवार (दि. २२) रोजी रस्ताकामाचे उद्घाटन चंदगड तालुका राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य बसवंत कांबळे, क्रांती सुतार, मनोहर सिद्धार्थ, शशिकांत जाधव, गोपाळ आडाव, नारायण भोगण, बाळाराम करडे, नंदकुमार आडाव, बाळाराम भोगण, केदारी आंदोचे, संदीप जाधव, महादेव आडाव, बसवराज पुजारी यांच्यासह कोनेवाडी येथील मोनाप्पा पाटील, निंगो कंग्राळकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

Back to top button