संभाजी महाराजांचा बलिदान दिन ‘धर्मवीर दिन’ घोषित करा : तेलंगणचे आमदार राजासिंह ठाकूर

संभाजी महाराजांचा बलिदान दिन ‘धर्मवीर दिन’ घोषित करा : तेलंगणचे आमदार राजासिंह ठाकूर
Published on
Updated on

पुणे : जनआक्रोश मोर्चा हा हिंदूंचा आक्रोश नाही, तर हिंदूंची गर्जना आहे. हजारोंच्या संख्येने हिंदू या मोर्चात सहभागी झाले आहेत, त्यांच्यासमोरच आम्ही संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला धर्मवीर दिन म्हणून घोषित करा, अशी मागणी शासनाकडे करीत आहोत. जर मागणी मान्य झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा काढू, असा इशारा तेलंगणचे आ. राजासिंह ठाकूर यांनी दिला.

रविवारी सकाळी 11 च्या सुमारास लालमहाल येथून निघालेला जनआक्रोश मोर्चा दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आला. या वेळी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई तसेच पुण्यातील आमदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी वंदे मातरमने मोर्चाची सांगता झाली.

या वेळी आमदार राजासिंह ठाकूर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उपस्थित आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे. मी महाराष्ट्रात येतो तेव्हा महाराष्ट्रात मला हिंदुत्व पाहायला मिळते. मागे तेलंगणा सरकारने मला अटक केली त्यांना वाटले, राजासिंह तुटून जाणार, माझे बोलणे बंद होईल. मात्र, तसे होणार नाही. जेलमधून बाहेर आल्यावर मी पहिला कार्यक्रम पुण्यात करत आहे.

मी जय श्रीराम म्हटले की, तेलंगणा सरकार माझ्यावर गुन्हा दाखल करते. तेलंगणा सरकारने जिहादीची फौज उभी केली आहे. तेलंगणा सरकारला वाटतेय, राजा सिंह बाहेर राहिले, तर आपल्याला अवघड जाणार आहे. म्हणून मला वरती पाठवण्याचा प्लॅन आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांनी जशी देश, धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याप्रमाणेच मी माझ्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे.

धर्मवीर रथाचे पुष्पवृष्टीने स्वागत…
लालमहालातून निघालेल्या मोर्चातील धर्मवीर रथ दुपारी बाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकात आला. हा रथ तेथून पुढे गेल्यावर लगेचच पुढे या रथावर पुष्प, तर मोर्चावर भगव्या कागदांची वृष्टी करण्यात आली.

लक्ष्मी रस्त्यावर घुमला शंखनाद
मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. पारंपरिक वस्त्रे परिधान करून महिला आणि पुरुष या मोर्चाचे नेतृत्व करीत होते. मोर्च्याच्या सुरुवातीलाच असलेल्या पुणेरी वेशभूषेतील मोर्चेकर्‍यांनी लक्ष्मी रस्त्यावर शंखनाद केला. या शंखनादामुळे संपूर्ण लक्ष्मी रस्ता दणाणून निघाला होता.

ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप…
लालमहालापासून निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यांना चालताना ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संस्थांनी पाण्याचे वाटप केले.

'लव्ह जिहादविरोधात कायदा करा'
लव्ह जिहादच्या विरोधात लढणे आपले कार्य आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवले जात आहे. महाराष्ट्रसह देशात लव्ह जिहादचे षड्यंत्र सुरू आहे. त्यामुळे कठोर कायदा करण्याची गरज आहे, असे राजासिंह ठाकूर म्हणाले.

'पुढच्या आरतीला येणार'
पुण्येश्वर महादेव मंदिरामुळे पुण्याची ओळख आहे. मात्र, सध्या ही ओळख पुसली गेली आहे. ती ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी पुण्येश्वर धामाला मुक्त करण्याची गरज आहे. आता मी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात आरती केली, पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर पुण्येश्वर धाम मंदिरात आरती करेन. पुण्येश्वर धाम मुक्त करण्यासाठी काही करावे लागले तरी त्याला माझी सामोरे जायची तयारी आहे, असे ठाकूर म्हणाले.

'गणेशोत्सवातील गुन्हे मागे घ्या'
महाविकास आघाडीच्या काळात पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ते तातडीने मागे घ्यावेत. केंद्रात आणि राज्यातही हिंदुत्ववादी सरकार आहे, त्या सरकारलाही मी ही विनंती करणार आहे, असे ठाकूर म्हणाले.

असा झाला मोर्चा…

सकाळी 11 वाजता लालमहाल येथून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात
दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराज चौकात मोर्चा पोहचला.
संभाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती आणि वंदे मातरम् झाल्यानंतर दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मोर्चाची सांगता झाली.

धर्माला अध्यात्माची जोड असणे महत्त्वाचे आहे. हिंदू समाजाला एकत्र येण्याची गरज आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. देव, देश, धर्मासाठी कोणतीही तडजोड आमच्याकडे नाही. या तिन्ही गोष्टींसाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्र आले पाहिजे. संभाजी महाराजांवर राजकारण करणे दुर्दैवी आहे. राजकारणी मतदान, मतदार टिकवण्यासाठी काहीही बोलतात, हे चुकीचे आहे. तसेच, शासनाने छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पर्यटनस्थळ म्हणून घोषित न करता तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी आमची मागणी आहे.
                                                                    – छत्रपती शिवेंद्रराजे भोसले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news