कोल्हापूर : हुपरीतील चांदी उद्योजकांना मिळणार केंद्र सरकारचे ओळखपत्र! नगरपालिकेकडून माहिती घेण्याचे काम  सुरू | पुढारी

कोल्हापूर : हुपरीतील चांदी उद्योजकांना मिळणार केंद्र सरकारचे ओळखपत्र! नगरपालिकेकडून माहिती घेण्याचे काम  सुरू

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : हुपरी नगरपालिकेने शहरातील चांदी उद्योजकांची माहिती व फोटो सोमवारपर्यंत देण्याचा आदेश दिला आहे. येथील उद्योजकांना चांदी दागिन्यांच्या विक्रीसाठी परराज्यात फिरत असताना अनेकवेळा त्रास दिला जातो. त्यामुळे येथील उद्योजकांना केंद्र सरकारकडून ओळखपत्र मिळावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली होती. याची दखल घेत मंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हुपरी नगरपालिकेला शहरातील चांदी उद्योजकांची माहिती व फोटो सोमवार पर्यंत देण्याचा आदेश दिला आहे.

हुपरी परिसरातील चांदी उद्योजक चांदी दागिने घेऊन पूर्ण देशात फिरत असतात. त्यांना चोर दरोडेखोर यांच्यापासून त्रास होतोच. मात्र, पोलिस तसेच शासकीय यंत्रणाही त्रास देते. त्यामुळे हस्तकला उदयोग म्हणून या भागातील चांदी उद्योजकांना केंद्र शासनाचे ओळखपत्र मिळावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयश्री गाट व अमित गाट यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत मंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी हुपरी नगरपालिकेचे प्रशासक विशाल पाटील यांना शहरातील चांदी उद्योजकांची माहिती, फोटो याचा सविस्तर अहवाल सोमवारपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरपालिकेने शहरातील उद्योजकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले असून त्यासाठी सहा क्लार्क नेमले आहेत. त्यांच्याकडे चांदी उद्योजकांनी तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. दरम्यान, चांदी कारागिरांना सवलती व अनुदान मिळण्यासाठी कामगारांच्या कल्याणकारी मंडळात त्यांचा समावेश करावा, यासाठी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. याबाबतही कार्यवाही सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक पुढारीचा पाठपुरावा व बातम्यांची दखल

यासंदर्भात ‘दैनिक पुढारी’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. परराज्यात जात असताना चांदी उद्योजकांची होणारी लूट, शासकीय यंत्रणा व पोलिस खाते यांच्याकडून होणारा त्रास तसेच हुपरी परिसरातील चांदी कारागिरांना कल्याणकारी मंडळात स्थान देऊन त्यांना सवलती व योजनांचा लाभ द्यावा, यासाठी ‘दैनिक पुढारी’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताची कात्रणे अमित गाट यांनी निवेदनाबरोबर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिली होती. त्याचे गांभीर्य पाहून मंत्री शिंदे यांनी तात्काळ हा आदेश दिला आहे. त्यामुळे दैनिक पुढारीचे अभिनंदन होत आहे.

Back to top button