कोल्हापूर : केव्हा होणार काळम्मावाडीच्या पाण्याने अभ्यंगस्नान? | पुढारी

कोल्हापूर : केव्हा होणार काळम्मावाडीच्या पाण्याने अभ्यंगस्नान?

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : कोल्हापुरात कोणत्याही महत्त्वाच्या चौकामध्ये एका कोपर्‍यात तटस्थपणे उभे राहा. वाहतुकीच्या सिग्नलवरून वाहन पास होण्यासाठी किमान दोन सिग्नल प्रतीक्षा करावी लागते आहे. सिग्नलमागे मोठी रांग लागल्यामुळे मुख्य रस्त्याला जोडणार्‍या छोट्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते आहे. यामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या पर्यटकांनी गर्दी केली की, वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडतो आहे. या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी उड्डाणपुलांची, भुयारी मार्गाची उभारणी करणे हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे.

राज्यामध्ये महानगरे सोडा, कोल्हापूरपेक्षा कमी भौगोलिक महत्त्व असलेल्या शहरांमध्ये असे उड्डाण पुलाचे जाळे उभे राहिले. पण कोल्हापुरात मात्र दोन उड्डाण पुलांव्यतिरिक्त नवे उड्डाण पूल प्रस्तावितच झाले नाहीत, तर ते उभारणार केव्हा? हा प्रश्न राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर कोल्हापूरच्या वाहतुकीचा बोजवारा उडण्यास अधिक कालावधीची आवश्यकता राहणार नाही. ताराराणी चौक, दाभोळकर चौक, व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, बिंदू चौक, महापालिका चौक, पितळी गणपती, कोळेकर तिकटी, खासबाग मैदान, राजारामपुरी, सायबर चौक… किती चौकांची नावे द्यावीत. प्रत्येक सिग्नलला शेकडो वाहने उभी राहतात आणि सिग्नल पास करण्यासाठी किमान दोन सिग्नल जाण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्याहीपेक्षा या कालावधीत वाहनातून ओकणार्‍या धुरापासून होणार्‍या प्रदूषणाचा जो त्रास सहन करावा लागतो आहे, ती बाब आणखीन निराळीच आहे.

शहराच्या उड्डाणपुलासारखाच काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा प्रश्नही असाच लोंबकळला आहे. या योजनेसाठी 1980 च्या दशकात माजी महापौर रामभाऊ फाळके यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून या प्रश्नाचे कवित्व सुरू आहे. या प्रश्नावर महापालिकेच्या चार निवडणुका लढविल्या गेल्या. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद अनेक निवडणुकांत हा प्रश्न अग्रभागी होता. 2014 साली त्याचा नारळ फुटला. 30 महिन्यांच्या कालावधीत काळम्मावाडीचे पाणी कोल्हापूरकरांना उपलब्ध होणे अनिवार्य होते. कोल्हापूरच्या बड्या वजनदार राजकीय नेत्यांनी तीन वर्षांपूर्वी शहरवासीयांना दिवाळीत काळम्मावाडीच्या पाण्याने अभ्यंगस्नान करा, असे अभिवचन दिले होते. तेव्हापासून नागरिक अंगाला तेल, उटणे लावून काळम्मावाडीच्या पाण्याची प्रतीक्षा करताहेत. राजकारण्यांनी राजकारण साधले, कारभार्‍यांनी ढपले पाडले. पण कोल्हापुरातील उड्डाणपूल आणि काळम्मावाडीच्या पाण्याने अभ्यंगस्नान हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत.

पावत्या फाडण्यात वाहतूक शाखा मग्न

काही ठरावीक वाहने उचलून आणि विशेषतः बाहेरून येणार्‍या पर्यटकांच्या गाड्या अडवून दंडाच्या पावत्या फाडण्यात वाहतूक पोलिस खाते मग्न आहे आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या विकासाची पहाट उगवण्यासाठी कोंबडे आरवणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोल्हापूरच्या विकासाचे उलटे चक्र

कोल्हापूरच्या विकासाचे चक्र गेल्या दोन दशकांमध्ये उलटे फिरले आहे. शहराच्या काही रस्त्यांचा अपवाद वगळता रस्त्यांचे रुंदीकरण नाही. वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळांची कमतरता आहे. जे रस्ते उपलब्ध आहेत, त्यांची दुरवस्था पाहण्यासारखी नाही. अन्य शहरांमध्ये उड्डाण पूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक यांसारख्या प्रकल्पांचे जाळे उभारल्यानंतर मेट्रो धावण्याची तयारी करू लागली आहे. पण तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या आणि राज्याच्या टोकावरील महत्त्वाचे केंद्र असलेल्या कोल्हापुरात मात्र या प्रकल्पांसाठी अद्याप श्रीगणेशाही झालेला नाही. परिणामी सर्वच कारभार रामभरोसे चालला आहे.

Back to top button