कोल्हापूर : ‘गोकुळ’चे मंगळवारपासून चाचणी लेखापरीक्षण | पुढारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे मंगळवारपासून चाचणी लेखापरीक्षण

कोल्हापूर; डी. बी. चव्हाण :  राज्य लेखा परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षणाचे काम येत्या मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांनी गोकुळच्या प्रशासनाकडे केली आहे. मसुगडे यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून शासनाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी प्रस्ताव सादर केला होता, पण शासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आपण हा प्रस्ताव मागे घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणाचे काम आपण सक्षमपणे करू, असेही त्यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या 2021-22 या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विभागाच्या लेखा परीक्षण मंडळाकडे केली होती. त्यानुसार या मंडळाने गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. मसुगडे म्हणाले, गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी आपणास शासनाकडून 16 जानेवारी रोजी आदेश प्राप्त झाला आहे, आदेश मिळाल्यानंतर आपण लेखापरीक्षणासाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे गोकुळला मेलवरून कळवले आहे. आपण येत्या मंगळवारी कोल्हापुरात येणार आहोत. लेखा परीक्षा मंडळाने दहा दिवसांत लेखापरीक्षण करण्याचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आपण कार्यवाही सुरू करत आहोत. चाचणी लेखापरीक्षण असल्यामुळे काही मुद्द्याची काटेकोरपणे तपासणी करावी लागेल. त्यासाठी गोकुळ दूध संघ प्रशासनाकडून आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली आहे.

मसुगडे हे मे महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव डिसेंबर 2022 मध्ये लेखा परीक्षण विभागाकडे सादर केला होता. पण एक महिनाभर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी आपला प्रस्ताव मागे घेतला आहे, आपण कामगावर रुजू झालो असून येत्या मंगळवारपासून आपण गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करू, असे त्यांनी सांगितले.

गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षण मंडळाने दि. 11 जानेवारी आदेश काढला आहे. हा आदेश गोकुळ प्रशासनाला गुरुवारी प्राप्त झाल्याचे गोकुळच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button