कोल्हापूर : सादळे-मादळे डोंगरात गव्याचा वावर ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

कोल्हापूर : सादळे-मादळे डोंगरात गव्याचा वावर ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : मागील पंधरा दिवसांपासून गवे कोल्हापूर शहरात व नदी परिसरात दिसून येत आहेत. आज (दि.२) सकाळी सादळेच्या सिद्धेश्वर डोंगरात दोन गवे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. ज्वारी, गवत कापणीच्या हंगामातच परिसरात गव्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन दिवसांपासून गव्यांचे ठसे कासारवाडी शेत शिवारात दिसून येत आहेत; पण गवे निदर्शनास आले नव्हते. सोमवारी सकाळी सातच्‍या सुमारास योग सेवा फाउंडेशन पेठवडगावचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हे सहकाऱ्यांसह सिद्धेश्वर डोंगरावर साफसफाई करीत होते. यावेळी त्यांना दोन गवे मनपाडळेच्या दिशेला जाताना दिसून आले. त्यानंतर त्यांनी परिसरात गवत कापणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना सतर्क केले. मागील वर्षी जानेवारी महिन्यातच गवे सादळे, कासारवाडीसह परिसरात दाखल झाले होते. ते जवळजवळ सात महिने या परिसरात वावरत होते. या परिसरात ज्वारी, मका पीक अधिक असल्याने गवे अधिक काळ येथे वास्तव्यास असल्याची चर्चा आहे.

आत्ता ज्वारी पिकाला पाणी देणे गरजेचे आहे. रात्रीचीच वीज येत असल्याने पिकांना पाणी देणे जोखमीचे झाले आहे. मागील हंगामात ऐन बहरात आलेल्या ज्वारी पिकांचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले होते.
-प्रकाश खोत
शेतकरी, कासारवाडी

हेही वाचा :

Back to top button