Sammed Shikharji : तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित केल्याबद्दल जैन धर्मियांकडून निषेध | पुढारी

Sammed Shikharji : तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित केल्याबद्दल जैन धर्मियांकडून निषेध

किणी( पुढारी वृत्तसेवा) : झारखंड येथील जैन धर्मियांचे तिर्थस्थळ सम्मेद शिखरजीला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला भारतातील समस्त जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून किणी येथे आज कडकडीत बंद पाळून मूक मोर्चा काढण्यात आला. सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे हृदय असल्याने या सिद्धक्षेत्राबाबत झारखंड सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे समाजाची एकता संयम आणि शांतता या मार्गातूनच हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू, असे मत १०८ श्री विदेहसागरजी महाराज यांनी व्यक्त केले. Sammed Shikharji

यावेळी उपस्थित मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना १०८ श्री विदेह सागरजी महाराज यांनी सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे सर्वोच्च स्थान असून ही मोक्ष भूमी आहे. सरकारने या पवित्र भूमीला पर्यटन स्थळ घोषित केल्याने येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. संपूर्ण देशातील जैन समाजाचे हे श्रद्धास्थान आहे. जैन धर्माचे एकूण २४ तीर्थंकर यापैकी २० तीर्थंकर या पवित्र स्थळातून मोक्ष मार्गाला गेलेले आहेत त्यामुळे शिखरजी हे संपूर्ण देशातील जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असल्याने कोणत्याही सरकारने या पवित्र स्थळाशी छेडछाड करू नये, असे सांगितले. Sammed Shikharji

मोर्चाची सुरुवात १००८ भगवान पार्श्वनाथ मंदिरापासून झाली, गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चात हजारो जैन बांधवासह इतर समाजातील नागरिकही सहभागी झाले होते, पाटील वाड्यासमोर विसर्जित झालेल्या मोर्चानंतर गावकामागर तलाठी ए. बी.मोमीन यांनी निवेदन स्वीकारले. दरम्यान आज सकाळपासूनच किणी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Sammed Shikharji

हे वचलंत का?

Back to top button