राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करा : खा. उदयनराजे | पुढारी

राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करा : खा. उदयनराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  अखंड भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज इतिहास संपूर्ण जगाला प्रेरणादायी असून नवी पिढी हाच इतिहास पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनमान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावा, नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे त्याचबरोबर राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशतान कायदा करावा, अशा मागण्या खा. छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना रयतेचा सहभाग महत्वाचा मानला त्यातूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया रचला. इतकेच नाही तर सर्व धर्मसमभावाची शिकवण देवून रयतेला सन्मानाची वागणूक दिली. प्रत्येक जातीधर्माचा आदर सन्मान केला, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना काही विकृत प्रवृत्तींकडून वारंवार अवमान केला जात आहे. अशा विकृत्ती नेस्तनाबूत करुन आपल्या महान राजाचा स्वाभिमान आणि सन्मान जतन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर ज्या ज्या राष्ट्रपुरुषांनी राष्ट्र उभारणीत सर्वस्व पणाला लावले त्यांचाही सातत्याने अवमान होत आहे. अशा विकृतींना आळा घालण्यासाठी काही मुद्यांवर भर देण्याची गरज आहे. पुढील मुद्यांवर केंद्र आणि राज्य सरकारने गांभिर्याने तात्काळ निर्णय घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा आणावा, अशी आमची मागणी आहे.

गेल्या काही दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सातत्याने अपमान जनक वक्तव्ये झाली आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी आपल्याला प्रतिक्रिया वादी व्हावे लागत आहे. त्यावर बिमोड करण्यासाठी कायदा करणे ही काळाची गरज आहे. त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करुन कच्चा मसूदा तयार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाज घटक आणि सर्व विचारधारांना आपलेसे वाटतात. त्यातून संबंधितांना आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या संबंधाने इतिहासाची मांडणी केली आहे. त्यातील काही मांडणी ही महाराजांचे चुकीचे चित्रण करणारी आहे. सर्वांत गंभीरबाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरुंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रुपात प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा मला विश्वास वाटतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच त्यांच्या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित अनेक सिनेमे, टिव्ही सिरियल्स, वेबसिरिज, डॉक्युमेंटरी प्रदर्शित होतात. त्यामध्ये अनेकदा काल्पनिक इतिहास किंवा इतिहासाची मोडतोड करुन ऐतिहासिक प्रसंग दाखवले जातात. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. या प्रकाराच्या कलाकृतीच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर बोर्डसारखी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून अनेकदा वादग्रस्त बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे खोटा इतिहास पसरवला जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सेन्सॉर बोडांला मदत करणारी इतिहास संशोधक, अभ्यासक तसेच तज्ज्ञ यांची एकसमिती नेमावी, असेही खा. उदयनराजेंनी म्हटले आहे.

Back to top button