कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात सरपंचपदासाठी सर्वाधिक महिला रिंगणात; उद्या ठरणार राजकीय भवितव्य | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात सरपंचपदासाठी सर्वाधिक महिला रिंगणात; उद्या ठरणार राजकीय भवितव्य

गुडाळ; आशिष पाटील : राधानगरी तालुक्यात निवडणूक झालेल्या ६६ ग्रामपंचायतींपैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदे महिलांसाठी राखीव होती. यासह तीन खुल्या जागांवर महिला निवडणूक लढवत आहेत. तालुक्यात ५०% पेक्षा जास्त सरपंच जागा महिला जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक उच्चशिक्षित महिला आणि तरुणींनी थेट सरपंच निवडणूक लढविली आहे, हे या टप्प्यातील निवडणुकीचे वैशिष्टय़ आहे.

महिला राखीव सरपंच पदाव्यतिरिक्त काही गावांत खुल्या जागांवरही महिलांनी थेट सरपंच पदाची निवडणूक लढवली आहे. खुल्या असलेल्या राधानगरीच्या सरपंच पदासाठी जिल्हा परिषद सदस्या सविता राजेंद्र भाटळे यांनी निवडणूक लढविली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या करंजफेण सरपंच पदासाठी शहाजी ढेरे यांनी उमेदवारी अर्ज असूनही अंतर्गत माघार घेतल्याने अंजना वागरे आणि करिष्मा मांगोरे या दोन महिलांमध्ये लढत झाली आहे. कांबळवाडी येथील खुल्या सरपंच पदासाठी अनिता सुरेश कुसाळे यांनी स्थानिक आघाडीकडून निवडणूक लढविली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांच्या त्या मातोश्री आहेत.

थेट सरपंच पदाची निवडणूक अनेक उच्चशिक्षित महिलांनी लढवल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही उच्चशिक्षित मुलींनीही गावच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरपंचपदाची निवडणूक लढविली आहे. धामोड सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या शोभा विश्वास बिडकर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

आमजाई व्हरवडेच्या सरपंच पदाच्या उमेदवार शामल प्रकाश पाटील हीने एम.एस.सी, बी.एड केले आहे. सिरसे सरपंच पदासाठीच्या उमेदवार दिपश्री अतुल कांबळे यांनी एम.ए.बी.एड, आवळी बुद्रुक येथील सरपंच पदासाठीच्या उमेदवार अस्मिता संदीप सुतार यांनी एमए.डी.एड, सोन्याची शिरोली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवार सुप्रिया संभाजी चौगले यांनी एमए, पीएचडी तर अश्विनी गुरुनाथ चौगले यांनी बीए,डीएड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आकनूर सरपंच पदासाठी प्राजक्ता राजू कांबळे ही बीएससी नर्सिंग झालेली तरुणी आहे. करंजफेण सरपंच पदासाठी करिष्मा किशोर मांगोरे या शिक्षिका आहेत. तालुक्यातील अनेक उच्चशिक्षित महिलांनी थेट सरपंच पदाची निवडणूक लढविली आहे.

हेही वाचा :

Back to top button