कोल्हापूर : बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर; उच्च न्यायालयाचे आदेश | पुढारी

कोल्हापूर : बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर; उच्च न्यायालयाचे आदेश

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे दै. पुढारीचे वृत्त खरे ठरले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आठ दिवस बाकी असतानाच ही निवडणूक १५ मार्चपर्यंत स्थगित करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले. यामुळे बाजार समिती कार्यक्षेत्रातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळणार आहे.

बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या जाहीर झाल्याने २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते. २९ जानेवारी रोजी मतदान होणार होते. पण बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तीनशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असल्याने नवनिर्वाचित सदस्य बाजार समिती मतदानापासून वंचित राहणार होते. त्यासाठी बाजार समिती निवडणूक कार्यक्रम स्थगित करावा, ग्रामपंचायत गटातील यादी नव्याने तयार करावी, अशी याचिका भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया १५ मार्चपर्यंत स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

त्यामुळे आता ग्रामपंचायत गट वगळता इतर गटातील मतदार याद्या कायम राहतील. मात्र ग्रामपंचायत गटातील यादी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या समावेशासह नव्याने प्रसिद्ध होतील. दरम्यान, बाजार समिती निवडणूक आता किमान साडेतीन महिने लांबणीवर गेल्याने शेतकरी सहकारी संघाप्रमाणे बाजार समितीवर सुद्धा प्रशासकीय मंडळ येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button