कोल्हापूर : बांधकाम परवाने ऑफलाईन देणार | पुढारी

कोल्हापूर : बांधकाम परवाने ऑफलाईन देणार

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : ऑनलाईन बांधकाम प्रणालीत अनेक त्रुटी असल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आता ऑफलाईन बांधकाम परवाने देणार असल्‍याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. कोल्हापुरातील शंभरहून अधिक बांधकाम प्रकल्प ऑनलाईन यंत्रणेतील त्रुटीमुळे रखडले आहेत. बांधकाम परवाने ऑफलाईन देणार असल्‍याने आता हे सर्व प्रकल्प मार्गी लागणार आहेत. दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑफलाईन परवाने दिले जाणार आहेत.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. 5 मे 2021 रोजी बांधकाम परवाने हे फक्त ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच महापालिका व काही नगरपरिषदांचा समावेश केला. यात कोल्हापूरसह औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अकोला महापालिका, तर बीड, वर्धा, सावंतवाडी नगरपरिषद हद्दीचा समावेश होता.

ऑनलाईन यंत्रणेद्वारे बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना मंजुरी मिळण्यात कोल्हापूरसह अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येत होत्या.

आदेशानुसार कोल्हापूर महापालिकेने दि. 20 मे 2021 पासून ऑनलाईन बांधकाम परवाने देण्यास सुरुवात केली; पण यासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्येच अनेक त्रुटी निर्माण झाल्या. मे महिन्यापासून आजपर्यंत शंभरहून अधिक अर्ज बांधकाम परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी केवळ दहा टक्के बांधकामांना ऑनलाईन परवाने मिळाले आहेत.

तांत्रिक त्रुटीमुळे अन्य महापालिकांनी ऑफलाईन बांधकाम परवानेदेण्यास सुरुवात केली; पण कोल्हापूर महापालिकेने मात्र ऑनलाईन परवान्याचीच पद्धत सुरू ठेवली. दरम्यानच्या काळात क्रिडाई संघटनेने ऑनलाईन यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या.

अखेर नगरविकास खात्याने या तक्रारींची दखल घेऊन गुरुवारी ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी देण्याचे आदेश काढले. कोल्हापूरसह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपूर महापालिका व रायगड, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, सातारा जिल्हाधिकारी यांना याबाबत कळवण्यात आले आहे.

Back to top button