कोल्हापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी महाद्वार रोडवर ‘नो एन्ट्री’ | पुढारी

कोल्हापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी महाद्वार रोडवर ‘नो एन्ट्री’

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनाच्या दिवशी महाद्वार रोड गणेश मंडळांसाठी बंद करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी पर्यायी मार्गांनी इराणी खण येथे विसर्जनासाठी जावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी केले.

बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या मार्गावर बॅरिकेडस् लावून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. रविवारी होणार्‍या गणेश विसर्जनासाठी जिल्हा पोलिस दलाकडून तयारी करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाद्वार रोडवर मंडळांना मनाई करण्यात आली आहे. गतवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा मुख्य महाद्वार रोडचा भाग बंद करण्यात आला होता. यंदाही याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरातील चारही पोलिस ठाण्यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. त्यात विसर्जन मिरवणूक न काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याला मंडळांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

विसर्जनासाठी पर्यायी मार्गांचा विचार सुरू आहे. विक्रमनगर, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, शाहूपुरी, रविवार पेठ, लक्ष्मीपुरीकडून येणारी मंडळे उमा टॉकीज, बिंदू चौक, पापाची तिकटी, गंगावेसमार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ होतील. उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, जुना बुधवार, शनिवार पेठ येथील गणेश मंडळे पापाची तिकटी, गंगावेसमार्गे पुढे जातील. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर परिसरातील मंडळांनी जवळच्या मार्गाने इराणी खण येथे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळांसोबत एक पोलिस

विसर्जनासाठी येणार्‍या मंडळांसोबत प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. महिला सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सहा निर्भया पथके कार्यरत आहेत.

परिसरात ‘नो पार्किंग’

इराणी खण परिसरात विसर्जनादिवशी गर्दी होते. तसेच रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहने थांबून असतात. हा मार्ग पूर्णपणे रिकामा ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत; अन्यथा वाहनमालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button