

कागल, पुढारी वृत्तसेवा : कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम आमदार हसन मुश्रीफ यांनी बंद पाडले. कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मीदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस उंच डोंगरावर हे काम सुरू होते. नगरपालिकेच्यावतीने दोन वेळा नोटीस देऊनही ही कंपनीचे काम सुरूच हाेते. बेकायदेशीररित्या वन विभागाची जमीन खोदून हजारो झाडांची कत्तल केली. तरीही फॉरेस्टवाले झोपलेत काय? असा सवाल आमदार मुश्रीफ यांनी केला.
याबाबत अधिक माहिती अशी, ही जागा कागल -हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीत असल्याचे सांगत कंपनीने भल्या मोठ्या लोखंडी फॅब्रिकेशनचे बांधकाम सुरू केले आहे. कागल नगरपालिका या जागेची प्लॅनिंग ॲथॉरिटी असल्यामुळे बांधकाम परवाना देण्याचा अधिकार नगरपालिकेचा आहे. बांधकामासाठी परवानगी ही न घेतल्यामुळे आतापर्यंत दोन लेखी नोटीस दिल्या आहेत. तरीही काम सुरूच होते. शेवटी आमदार हसन मुश्रीफ यांनी हे काम आज बंद पडले.
मुश्रीफ म्हणाले, लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली येथे भले मोठे गोडाऊनचे बांधकाम सुरू आहे. येथून सांडपाणी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावात येऊन संपूर्ण कागल शहराचे पिण्याचे पाणीही दूषित होणार आहे. ही जागा पंचतारांकित एमआयडीसीची असूच शकत नाही. कोणतीही परवानगी न घेता हे मोठे बांधकाम सुरू आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा