

कसबा बावडा ; पुढारी वृत्तसेवा : अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देत, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात आधुनिक तलवारबाजी अकादमी स्थापन करणार असल्याची माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिली. जागतिक तलवारबाजी दिनाचे औचित्य साधून मंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राऊंड येथे अत्याधुनिक तलवारबाजी हॉल भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री सतेज पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते अत्याधुनिक वास्तूचा भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, आधुनिक साहित्यासह राष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात तलवारबाजी अकादमी अर्थात फेंसिंग ॲकॅडेमी विकसित करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा मानस आहे.
तलवारबाजी खेळात गेल्या शंभर वर्षांमध्ये अमूलाग्र बदल झाले आहेत. तलवारबाजी हा खेळ इलेक्ट्रॉनिक साहित्याद्वारे खेळला जात आहे. त्यामुळे या क्रीडाप्रकाराकडे युवा पिढी आकर्षित होत असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राउंड परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
येणाऱ्या काळात तलवारबाजीसह विविध खेळांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोढे, दिलीप घोडके, विकास वाघ, डॉ. पांडुरंग रणमाळ, प्रशांत जगताप, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती हरी पाटील, माजी नगरसेवक-नगरसेविका, श्रीराम संस्थेचे संचालक, खेळाडू आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विलास पिंगळे यांनी केले.
हेही वाचलं का ?