इचलकरंजी : मध्य प्रदेशातील प्रेयसीला बसस्थानकात सोडून प्रेमवीराची धूम | पुढारी

इचलकरंजी : मध्य प्रदेशातील प्रेयसीला बसस्थानकात सोडून प्रेमवीराची धूम

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : ‘वफा’ या सोशल मीडियाद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून मध्य प्रदेशातील युवतीला प्रियकराने इचलकरंजीतील मध्यवर्ती बसस्थानकात सोडून पोबारा केल्याचे निर्भया पथकामुळे उघडकीस आले. संबंधित युवतीला ताब्यात घेतले असून पसार प्रियकाराचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोशल मीडियावरील ‘वफा’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील युवतीचा कर्नाटकातील एका तरुणाशी संपर्क झाला. त्यातूनच दोघांची ओळख होऊन महिन्याभरातच मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यातूनच प्रियकराने तिला शिमोगा बंगळूर येथील आपल्या घरी नेले. दोन दिवसांनी नातेवाईकांनी नकार दिल्याने तिला घेवून तो घराबाहेर पडला. प्रियकारने तिला बसमधून घेवून आज सकाळी इचलकरंजी गाठले. येथील मध्यवर्ती बसस्थानकात युवतीला त्याने थोड्याच वेळात येतो, असे सांगून पोबारा केला.

तासाभरानंतरही प्रियकर परत न आल्याने युवतीने बसस्थानकात हंबरडा फोडला. ही घटना निर्भया पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर तिला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिची प्रेमप्रकरणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत, कॉन्स्टेबल स्वाती जाधव, सहायक फौजदार लक्ष्मण मुठे, राहुल मगदूम आदींच्या पथकाने केला.

पोलिसांनी तिच्या संबंधित तरुणीच्या पालकांशी संपर्क साधला आहे. ते शनिवारी इचलकरंजीत आल्यानंतर तिला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
-उर्मिला खोत, पोलीस उपनिरीक्षक (निर्भया पथक)

हेही वाचलंत का ? 

Back to top button