कुरुंदवाड : बालचमूंनी साकारली प्रतापगड-रायगड-जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती | पुढारी

कुरुंदवाड : बालचमूंनी साकारली प्रतापगड-रायगड-जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड व परिसरात दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बालचमुंनी प्रतापगड रायगड जंजिरासह विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. या बालचमुंनी किल्ला स्पर्धेत सहभाग नोंदवला. कमान, मावळे, उंट, हत्ती घोडे, तोफा अशा साहित्यांनी सजलेले किल्ले अनेकांना आकर्षित करत आहेत. दिवाळीची चाहूल लागण्यापूर्वी बच्चे कंपनी किल्ला तयार करण्यासाठी आतूर झालेले असतात. सहामाही परीक्षा संपून सुट्ट्यांना सुरुवात झाली. मुलांचा मेळा प्रत्येक घराच्या अंगणात जमतो. रायगड, राजगड, शिवनेरी, पन्हाळा, विशाळगड, तोरणा आदी शिवरायांनी उभारलेल्या गडांच्या प्रतिकृती हे बालचमू तयार करत असतात. यंदा भर पावसातही अनेक मुलांनी किल्ले तयार केले. दगड, विटा, माती त्याला रंगरेषांची जोड देत अनेक किल्लांच्या प्रतिकृती तयार केल्या. पर्यायी नेत्यांचे शुभेच्छांचे काढलेले डिजिटल पोस्टरचा मांडव घालून आपली इच्छा पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्रतिकृतीच्या किल्ल्यावर विराजमान केले.

ज्यांना पावसामुळे किल्ले तयार करता आले नाहीत, त्यांनी तयार प्रतिकृती आणून आनंद साजरा केला. शंभर रुपयांपासून तब्बल दोन हजार रुपयांचे किल्ले खरेदी करण्यासाठी कुंभरवाड्यात येथील मुलांनी पालकांसह गर्दी केली होती. ढाल-तलवार घेतलेले मावळे, हत्ती, उंट, सिंह यांच्याबरोबर आकर्षक बुरुज आणि तटबंदीही विक्रीसाठी उपलब्ध होती. छत्रपती शिवरायांची सिंहासनरुढ व अर्ध पुतळा मुले खरेदी करत होते.

Back to top button