Share Market Today | शेअर बाजारात सकारात्मक वातावरण, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत खुला | पुढारी

Share Market Today | शेअर बाजारात सकारात्मक वातावरण, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत खुला

Share Market Today : बुधवारच्या सुट्टीनंतर गुरुवारी खुल्या झालेल्या भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. गुरुवारी सेन्सेक्स ३३६ अंकांनी वाढून ५९,८८० वर खुला झाला. तर निफ्टी ११५ अंकांनी वाढून १७,७०० वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स, निफ्टीची तेजी वाढत जाताना दिसत आहे. एचडीएफसीचे शेअर्स २ टक्क्यांनी वधारले आहेत. JSW Steel, हिंदाल्को, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आणि टाटा स्टील हे आज NSE प्लॅटफॉर्मवर टॉप गेनर्स ठरले आणि त्यांचे शेअर्स २.२५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

दरम्यान, आज सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ६७ पैशांनी वाढून ८२.१४ वर पोहोचला. प्रमुख बँका येत्या काही महिन्यांत व्याजदर वाढीचा वेग कमी करतील या अपेक्षेने आज आशियाई समभाग वाढले. पण न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज रात्रभर झपाट्याने कोसळला. यामुळे देशांतर्गत निर्देशांकातील नफा मर्यादित राहू शकतो, कारण जागतिक तेलाच्या किमती मागील सत्रात ३ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा आयातदार आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम महागाईवर होतो.

सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ९४.५ अंकांनी वाढून १७,९३३ वर व्यवहार करत आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या निराशाजनक अहवालानंतर अमेरिकेचा नॅस्डॅक निर्देशांक घसरला. यानंतर टोकियोच्या शेअर्समध्ये गुरुवारी घसरण दिसून आली. निक्केई २२५ निर्देशांक ०.१२ टक्के म्हणजेच ३२ अंकांनी खाली येऊन २७,३९९ वर खुला झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.१४ टक्क्यांनी घसरून १,९१५ वर आला होता.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी २४७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ८७३ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली. दिवाळी बलिप्रतिपदाच्या निमित्ताने बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद होते. BSE सेन्सेक्स मंगळवारी २८८ अंकांनी म्हणजे ०.४८ टक्क्यांनी घसरून ५९,५४४ वर बंद झाला होता. तर NSE निफ्टी ७४ अंकांनी म्हणजे ०.४२ टक्क्यांनी घसरून १७,६५६ वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button