शिरटी येथील तंटामुक्त अध्यक्ष निवडीकडे तालुक्याचे लक्ष; निवड सभा वादळी होण्याची शक्यता.. | पुढारी

शिरटी येथील तंटामुक्त अध्यक्ष निवडीकडे तालुक्याचे लक्ष; निवड सभा वादळी होण्याची शक्यता..

शिरोळ;  पुढारी वृत्तसेवा : शिरटी (ता. शिरोळ) येथे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड उद्या सोमवार (दि.१७) रोजी होणार आहे. निवडीसाठी सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षपदासाठी दोनच अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असल्याने ही निवड सभा चुरशीने वादळी होण्याची दाट शक्यता आहे.

सोशल मीडियावरून दोन्ही उमेदवारांचे समर्थन व प्रचार ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागून राहिले आहे. संतोष रायगोंडा पाटील यांचा तंटामुक्त अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने ही निवड प्रकिया होत आहे. यासाठी संतोष पाटील यांनी पुन्हा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना यड्रावकर व यादव गटाने जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे फलक विविध चौकात लावले आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात प्रमोद महाबळ पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना गणपतराव पाटील व उल्हास पाटील गटाचा पाठिंबा आहे.

इतरवेळी घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभेला मोजकेच लोक उपस्थित राहतात. मात्र तंटामुक्त अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी रात्री-मध्यरात्रीपर्यंत ग्रामस्थांच्या घरी फिरून आमच्याच बाजूने उपस्थित राहा असे आवाहन करत आहेत. सोशल मीडियावर दोन्ही उमेदवारांचे समर्थन करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.  गेल्या दोन-तीन वर्षांपासून राजकिय द्वेषातून सतत वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यापूर्वीच्या अध्यक्षपदाच्या निवडीला बिनविरोधची परंपरा आहे. मात्र, प्रथमच निवडणूक घेऊन तंटामुक्त अध्यक्ष निवड होत असल्याने वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

हेही वाचा;

Back to top button