पिंपरी : ब्रेक फेल झालेल्या शिवशाही बसची सात वाहनांना धडक; नऊजण जखमी | पुढारी

पिंपरी : ब्रेक फेल झालेल्या शिवशाही बसची सात वाहनांना धडक; नऊजण जखमी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही बसने सात वाहनांना धडक दिली. यामध्ये एकूण नऊजण जखमी झाले आहेत. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर रविवारी (दि. १६) दुपारी पाषाण तलाव येथे हा अपघात झाला.

विशाल तायाप्पा निंबाळकर (२६, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे), अमित झा (३५, रा. हिंजवडी), कमलेश रामेश्वर महापुरे (२८, रा. आळंदी), तानाजी नारायण देशमुख (६२, रा. कल्याण), कल्पना तानाजी देशमुख (५४, रा. कल्याण) अशी जखमींची नावे आहेत. अन्य चार वाहनांमधील जखमींबाबत माहिती मिळू शकली नाही. विलास मानसिंग जाधव (५५, रा. उडतरे, ता. वाई, जि. सातारा) असे शिवशाही बसचालकाचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास जाधव हे रविवारी बोरिवली ते सातारा अशी शिवशाही बस (एमएच ०४/जेके ३१४९) घेऊन जात होते. दरम्यान, दुपारी पाषाण तलाव परिसरात आल्यानंतर बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे जाधव यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने समोर जात असलेल्या वाहनांना धडक दिली.

यामध्ये होंडा डिलक्स (एमएच ४२/बीडी ८०७४), पॅशन प्रो (एमएच १२/केएफ ५६२७), टाटा टियागो (एमएच १४/जेयु १६२०), मारुती एर्टिगा (एमएच ०५/सीएम ५३१९), सेलेरिओ (एमएच १२/एसएफ ३०८७), स्विफ्ट (एमएच १२/केई ४९१६), वॅगनआर (एमएच १३/केवाय ३२८३) या वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

Back to top button